बोंबला! कोरोनाच्या भीतीने वाशिंग मशीनमध्ये धुतले तब्बल 14 लाख रुपये, आणि …

कोरोना विषाणूचा हाहाकार दिवसेंदिवस वाढतच चालला असून जगभरात लाखो लोक यामुळे मृत्युमुखी पडले आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्याने याचा नागरिकांनी धसका घेतला आहे. लोक चांगलीच सावधगिरी बाळगत असून विचित्र घटनाही घडत आहेत.

काही दिवसांपूर्वी एक महिला सॅनिटायझरने भाज्या धुताना दिसली होती, मात्र आता एका व्यक्तीने असा प्रताप केला आहे की ज्यामुळे त्याला आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. कोरोनाच्या भीतीने या व्यक्तीने चक्क 14 लाख रुपये वाशिंग मशीनमध्ये धुवून काढल्याचे समोर आले आहे. दक्षिण कोरियामधील ही घटना आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.

दक्षिण कोरियाच्या सियोल जवळील अंसन शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीने कोरोना संक्रमणाच्या भीतीने आपल्याकडील सर्व रुपये वाशिंग मशीनमध्ये टाकले आणि धुवून काढले. या व्यक्तीने जवळपास 14 लाख रुपये वाशिंग मशीनमध्ये धुतले. यानंतर हे रुपये सुकविण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवले. मात्र जास्त तापमानामुळे यातील काही पैसे जळून गेले.

कहर म्हणजे या जळालेल्या नोटा घेऊन हा व्यक्ती ‘बँक ऑफ कोरिया’मध्ये गेला आणि नोटा बदलून देण्याची मागणी करू लागला. अधिकाऱ्यांना त्याने आपण केलेला प्रताप सांगितला तेव्हा ते हैराण झाले आणि डोक्याला हात लावला. मात्र दिलासादायक म्हणजे बँकेने त्याला या नोटा बदलून दिल्या आणि त्याला 19 हजार 320 डॉलरच्या नोटा बदलून दिल्या.

बँकेचे अधिकारी वाउन यांनी याबाबत बोलताना सांगितले की, काही नोटा जास्तच खराब झाल्याने आम्ही त्या बदलून देऊ शकलो नाही. नंतर इतर नोटा नियमानुसार बदलून देण्यात आल्या. तसेच ज्याने हे नोटा धुण्याचे काम केले त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही. मात्र हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या