हजवरून आलेल्या माय-लेकाला कोरोना, हातावरील शिक्के पुसत मुंबई ते लखनौ रेल्वे प्रवास केल्याने खळबळ

5655

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा फुगत असतानाच काही जणांकडून केंद्र सरकारने केलेल्या सूचनांचे पालन होताना दिसत नाहीये. याचा तोटा हजारो लोकांना होण्याची शक्यता आहे. अनेक जण होम क्वारंटाईन असतानाही राजरोस फिरत असल्याचा समोर आला आहे. मुंबईतही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हज यात्रेला गेलेला समूह परत आल्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले होते. मात्र हे शिक्के पुसून त्यांनी प्रवास केल्याचे आणि यातील माय-लेकाला कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

‘आयएएनएस’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई विमानतळावर आरोग्य विभागाने हातावर मारलेला होम क्वारंटाईनचा शिक्का पुसून मुंबई-लखनऊ रेल्वे प्रवास करणाऱ्या माय-लेकाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू झाल्यानंतर आणि देशातही कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर मक्केला गेलेला 37 जणांचा समूह मायदेशी परतला होता. मुंबई विमानतळावर उतरलेल्या या 37 जणांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला होता. मात्र, त्यांनी विमानतळ सोडल्यानंतर होम क्वारंटाइनचा शिक्का मिटवला.

पकडले जाऊ या भीतीने त्यांनी मुंबईहून लखनऊला विमानाने न जाता, रेल्वेने प्रवास केला. 19 मार्चला हे सर्व घरी पोहोचले. यात हरारपूर येथील महिलेला घरी गेल्यानंतर त्रास सुरू झाला. महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांना महिला परदेशातून आली असल्याचे कळाले. त्यामुळे त्यांनी कोरोनाची तपासणी केली. त्यानंतर 22 मार्च रोजी आलेल्या रिर्पोटमध्ये महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने कुटुंबातील सर्वांची तपासणी केली. यात तिच्या मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हा मुलगाही आईसोबत मक्केला गेला होता. यामुळे आरोग्य विभागाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता त्या माय-लेकाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या