76 दिवसानंतर वुहान पूर्वपदावर येण्यास सुरुवात

कोरोनाच्या उद्रेकाचा केंद्रबिंदू असलेल्या वुहानमधील लॉकडाऊन तब्बल 76 दिवसांनंतर उठवण्यात आला आहे. याच ठिकाणापासून जगभरात हा जीवघेणा आजार पसरायला सुरुवात झाली होती. मंगळवारी चीनमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाहीये असं तिथल्या आरोग्य यंत्रणांचे म्हणणे आहे, ही बाब त्यांच्यासाठी दिलासादायक ठरू शकते. चीनमधली परिस्थिती सुधारत असली तरी आता हा आजार जगातील इतर देशांसाठी भयंकर मोठं संकट बनला आहे.

जगभरात हजारो लोकांचे जीव घेणाऱ्या या आजारामुळे वुहानमधील जनजीवन पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. कोरोनाचे रुग्ण नियंत्रित करण्यासाठी 10 आठवडे तिथल्या आरोग्य यंत्रणा वुहानमध्ये झगडत होत्या. बंदी उठवल्यानंतर वुहानमधील परिस्थिती कशी सुधारत जाते याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. मंगळवारी वुहानमध्ये फक्त 3 कोरोनाचे रुग्ण सापडले होते. रुग्णांचा आकडा कमी झालेला पाहिल्यानंतर इथली बंदी पूर्णपणे उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास 1 कोटी लोकसंख्या असलेला वुहान प्रांत हे तिथले एक मोठे औद्योगिक केंद्र आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तिथे कोरोनाचा उद्रेक झाला आणि तिथे विविध बंदींबाबतचे निर्णय अत्यंत कठोरतेने राबवण्यास सुरुवात झाली. मात्र तरीही कोरोनाचा फैलाव थांबला नाही. तिथल्या स्थानिक प्रशासनावर आरोप आहे की त्यांनी सुरुवातीला लागण झालेल्यांचे आणि मृतांचे आकडे लपवून ठेवले. यामुळे तिथली स्थिती उशिरा लक्षात आली. ती लक्षात आल्यानंतर आणि उपाययोजनांना सुरुवात करण्यापूर्वी परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणेपर्यंत अनेकांचे बळी गेले होते आणि आजार इतर देशांत पसरला होता.

वुहानमधील बंदी उठवत असताना तिथल्या प्रशासनाने आणि पोलिसांनी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी कडक निर्बंध घातले आहेत. सगळ्यांना चीन सरकारने तयार केलेल्या अॅपमध्ये काही माहिती भरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या माहितीमध्ये घराचा पत्ता, प्रवासाचा इतिहास, आरोग्याबाबतची माहिती. कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे अथवा नाही याचा सगळा तपशील भरावा लागतोय. वुहानमधल्या शाळा अजूनही बंद असून तिथल्या प्रशासनातर्फे गरज नसल्यास घरीच थांबण्याची अजूनही विनंती केली जात आहे.

बंदी उठवल्याच्या काही क्षणातच वाहनांची टोलनाक्यावर गर्दी झालेली पाहायला मिळाली. मात्र मेट्रो, रेल्वे, बस यामधून प्रवास करणाऱ्यांची संख्या अजूनही कमी पाहायला मिळते आहे. वुहानमधील उद्योग 94 टक्के सुरू झाले आहेत असी माहिती तिथले उपमहापौर हू याबो यांनी दिली आहे. तिथल्या विविध आस्थापनांमध्ये काम करणारे 60 टक्केच कर्मचारीच सध्या कामावर आहेत .

आपली प्रतिक्रिया द्या