मरकजला सांगली,पुण्यातून किमान 133 जण गेले असल्याची माहिती

1346

दिल्लीतील निजामुद्दीन भागामध्ये असलेल्या मरकजमध्ये मुसलमानांच्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी देशविदेशातून अनेक मुसलमान एकत्र आले होते. या ठिकाणी अनेकांना कोरोनाची लागण झाली असून हे सगळे जण आपापल्या भागात परतल्याने त्यांच्या मार्फत अनेकांना कोरोनाची लागण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या मरकजमधल्या किमान 10 जणांचा देशाच्या विविध भागात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले आणि कोरोनाची लागण झालेले 93 जण देशभरात सापडले आहेत.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि पुण्यात असलेल्या 60 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या 60 जणांना कोरोनाची लागण झाल्याची लक्षणे दिसत नसली तरी त्यांची चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल येणं बाकी आहे असं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. या मरकजमध्ये सहभागी झालेल्या इतरांचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ज्यांचा शोध घेतला जातोय त्यातले अनेक जण हे सध्या पुण्यात नाहीयेत किंवा त्यांना थांगपत्ता लागत नाहीये असं नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

corona-andaman

पुण्याप्रमाणेच सांगली जिल्ह्यातूनही काही जण दिल्लीतल्या निजामुद्दीन मरकजमधल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्याकले 3 जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या 3 जणांना तातडीने क्वारन्टाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस आणि महापालिका प्रशासनाने यासाठी मोहीम सुरू केली असून लवकरच या तिघांना क्वॉरंटाईन केले जाईल. उमराहवरून परतलेल्या 4 जणांमुळे सांगली जिल्ह्यातील एकूण 24 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सगळे जण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे आधीच सांगली जिल्हा धास्तावलेला आहे, त्यातच ही नवी बातमी आल्याने पुन्हा कोरोनारुग्णांची संख्या वाढते की काय अशी भीती सांगलीकरांना वाटायला लागली आहे.

corona-screening-tent

तबलिगी जमात आणि मरकज म्हणजे काय ?
तबलीगचा अर्थ हा अल्लाह,कुराण आणि हदीसमधल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहचवणे जमातचा अर्थ हा गट असा होतो. हो देन शब्द जोडल्यास त्याचा अर्थ इस्लाममधल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहचवणारा गट असा अर्थ होतो. मरकजचा अर्थ ‘ केंद्र’ असा आहे. जवळपास 75 वर्षांपूर्वी मेवातच्या मौलाना इलियास यांनी मरकजची स्थापना केली होती. या केंद्र स्थापनेमागचा त्यांचा उद्देश अत्यंत चांगला होता. अशिक्षित मुसलमानांना वाममार्गाला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांना इस्लामने सांगितलेल्या रस्त्यावर आणि नमाजकडे आकर्षित करणं हा या केंद्राचा उद्देश होता. मुसलमानांनी नमाझ पढावा, रोजे पाळावेत, वाईट गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवावे, सत्याच्या मार्ग अवलंबावा यासाठी हे या केंद्राचे मुख्य उद्देश आहेत. या उद्देशांमुळेच अल्पावधीत दिल्लीतील निजामुद्दीन भागातील हे मरकज देशविदेशात प्रसिद्ध झाले. जगभरातून अनेकजण इथे यायला लागले. वाईटाकडून चांगल्याकडे मार्गक्रमणासाठी हे केंद्र मार्गदर्शन करायला लागले.

मरकजचा एक प्रमुख असतो ज्याला ‘अमीर’ म्हटलं जातं. त्याच्या सल्ल्यानुसार देशविदेशातील गट ज्यांना जमात म्हटलं जातं ते इस्लामच्या गोष्टी इतरांपर्यंत पोहचवण्याचे काम करतात. वाईट गोष्टी सोडा, चांगल्या गोष्टींची कास धरा, सत्याच्या मार्गावर चाला असा या जमाती संदेश देत असतात. नव्या सदस्यांना या जमाती जोडत असतात. या सदस्यांना मशिदीत जाणाऱ्या जमातीमध्ये सहभागी होण्यास सांगतात. मशिदींमध्ये या जमातीची एक समिती बनते ज्यातील सदस्यांची यादी ही मरकजला पाठवली जाते.

प्रत्येक जिल्ह्यात, राज्यात या जमातीचा प्रमुख म्हणजेच अमीर असतो. त्याचा आदेश मानणं हे जमातीतील प्रत्येकाला बंधनकारक असतं. जगभरातील सगळ्या जमातींवर निजामुद्दीन इथल्या मरकजचा अंकुश असतो. तबलिगी जमातीचे जलसे देशाच्या विविध भागात दरवर्षी होत असतात. या जलशांसाठी मोठी गर्दी होत असते. या जमातीचं मानणं आहे की देशात कोणतंही नुकसान झालं तर ते संबंधित यंत्रणेला दोष देण्याऐवजी स्वत:ला दोष देतात. खुदाने आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी जगात पाठवलं आहे. वाईट गोष्टी या इस्लामने सांगितलेल्या रस्त्यावरून भरकटल्याने किंवा भलाईचा मार्ग सोडल्याने घडतात असं या जमातीचं मानणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या