लसीकरण – आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी लक्षात आणून दिली चूक, केंद्राकडून दुरुस्तीचं आश्वासन

महाराष्ट्रात कोरोनाविरोधी लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक केंद्रांवर लसीकरणाचे काम थांबले आहे. अशातच नव्याने करण्यात आलेल्या लसीच्या वाटपात महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 7 लाख लसी आल्या आहेत. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांना 40 लाखाहून अधिक तर गुजरातला 30 लाख लसी देण्यात आल्या आहेत. लसीच्या या मॅनेजमेंट त्रूटीवरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधल्यावर पत्रकार परिषद घेत झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्रूटी लक्षात आणून दिल्यावर दुरुस्ती करून देऊ असं आश्वासन डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

‘नव्या पत्रकानुसार महाराष्ट्राला अवघ्या 7 लाख लसी मंजूर झाल्या आहेत. मात्र महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींची गरज आहे. त्या आम्हाला द्या’, अशी मागणी केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय आहे, आम्हाला कोणशीही वादविवाद करायचा नाही. मात्र इतर राज्यांना जशा 40 लाखापेक्षा अधिक लसी देण्यात आल्यात मग महाराष्ट्र जिथे अधिक गरज आहे त्याला अवघ्या 7 लाख लसी का? असा प्रश्न आहे. तो आम्ही त्यांच्यापुढे मांडला आहे. त्यावर दुरुस्ती करून देऊ असं आश्वासन डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आम्ही ही दुरुस्ती कधी करून मिळते याची आम्ही वाट बघत आहोत असे राजेश टोपे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या