कोविडग्रस्तांसाठी को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन धावली

कोरोना परिस्थिती गंभीर होऊ लागल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन मोठय़ा प्रमाणावर करण्याची गरज आहे. त्याच भावनेतून को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात 292 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या दादर येथील कार्यालयाच्या आवारात केईएम रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. युनियनचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार आनंदराव अडसुळ यांनी सहकारी बँकांमधील कर्मचाऱयांना या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत 377 कर्मचाऱयांनी सहभाग नोंदवला. त्यातील पात्र रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी युनियनचे सुनिल साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, सल्लागार अभिजीत अडसुळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या महामारीमध्ये युनियनने आयोजित केलेले हे तिसरे रक्तदान शिबिर आहे. याशिवाय कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी युनियनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटी 83 लाखांची मदतही देण्यात आली.

हे संस्कार शिवसेनाप्रमुखांचेच! – संजय राऊत

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी या रक्तदान शिबिराला भेट देऊन संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली. सर्व रक्तदात्यांचे त्यांनी आभार मानले. ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. एक यज्ञ आहे. आपण दिलेल्या रक्ताने कित्येक लोकांचे प्राण वाचतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांवर रक्तदानासारख्या पवित्र कार्याचे संस्कार केले. त्याच संस्कारातून शिवसेना आणि संलग्न संघटना रक्तदान शिबिरे आयोजित करुन समाजकार्य करत असतात.’ असे संजय राऊत यावेळी म्हणाले. रक्तदानासारख्या पवित्र कामाचे नियोजन आनंदराव अडसुळ यांच्यासारखा जमिनीवर पाय असलेला शिवसेनेचा नेताच करू शकतो असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.

आपली प्रतिक्रिया द्या