कोरोनामुक्त देशात 102 दिवसांनी आढळले 4 कोरोना रुग्ण, शहरात पुन्हा लॉकडाऊन

567

देश कोरोनामुक्त झाला तरी देखील या देशात कोरोनाची दहशत कायम आहे. न्यूझीलंडला कोरोनाच्या लढ्यात मोठं यश मिळालं होतं. मात्र आता 102 दिवसांनी कोरोनाची नवी प्रकरणं समोर आल्यानंतर पुन्हा सारे सतर्क झाले आहेत. सध्या चार रुग्ण आढळले असून त्यांना विलगिकरणात ठेवून तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत असून ऑकलंड शहरात तातडीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी मंगळवारी माहिती दिली की, अधिकाऱ्यांना ऑकलंडमधील एका घरात कोरोनाचे चार नवे रुग्ण आढळले आहेत. ते कोरोना संक्रमित कशामुळे हे अज्ञाप स्पष्ट झालेले नाही. देशात 102 दिवसांनी लोकल ट्रांसमिशनचे हे प्रकरण समोर आले आहे.

पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी जाहीर केले की, न्यूझीलंडचे सगळ्यात मोठे शहर अशी ओळख असलेल्या ऑकलंडला बुधवार मध्यरात्री पासून शुक्रवारच्या मध्यरात्रीपर्यंत तिसऱ्या क्रमांकाच्या अॅलर्टवर ठेवण्यात आले आहे. म्हणजेच लोकांना या कालावधित घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या कालावधित बार आणि अन्य व्यवसाय पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ऑकलंडमधील सर्व व्यवहार तीन दिवस बंद ठेवून कॉनट्रॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आले आहे. लोकांना सर्व प्रकराच्या दक्षता घेण्यास सांगितल्या आहेत. तीन दिवसात या चौघांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी तसेच संक्रमण कसे झाले हे शोधून काढणे हे कठीण असल्याची कल्पना आहे. मात्र आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

न्यूझीलंडमधील अन्य शहरांना दुसऱ्या क्रमांकाचा अॅलर्ट देण्यात आला आहे. ज्यामुळे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात केवळ 100 लोकांनाचा उपस्थित राहता येईल. तसेच सर्व नागरिकांना फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन बंधनकारक असेल.

आरोग्य संचालक एशले ब्लूमफील्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार एका 50 वर्षाच्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील 6 जणांची तपासणी केली असता तीन जण पॉझिटिव्ह आले तर तीन जण निगेटिव्ह.

आपली प्रतिक्रिया द्या