‘कोरोना फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है’, वुहान लॅबमधील ‘बॅट वूमन’ शी झेंगलींचे खळबळजनक विधान

चीनच्या वुहान प्रांतात असलेल्या लॅबमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार उडवून दिला आहे. आजपर्यंत 56 लाख लोकांना या प्राणघातक व्हायरसची लागण झाली असून जवळपास साडे तीन लाख लोकांनी जीव गमावला आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, हिंदुस्थान यासारख्या बड्या देशांचे जनजीवन आणि अर्थव्यवस्था यामुळे ठप्प झाली आहे. मात्र चीनमध्ये वटवाघूळ यांच्यावर संशोधन करणाऱ्या एका महिला व्हायरॉलॉजिस्टने ‘कोरोना फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है’, असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. वटवाघूळात कोरोना सारखे अनेक प्राणघातक विषाणू असल्याचे शी झेंगली यांनी म्हटले आहे.

‘बॅट वूमन’ या नावाने जगभरात विख्यात असणाऱ्या शी झेंगली चीनमधील ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’च्या डेप्युटी डायरेक्टर आहेत. वतवाघूळासारख्या जंगली जनावरांत कोरोना सारखे जीवघेणे व्हायरस असतात. वेळीच त्याचा शोध घेता आला नाही तर येणाऱ्या काळात जगाला कोरोना सारख्या किंवा त्यापेक्षा अधिक धोकादायक महामारीचा सामना करावा लागू शकतो, असे शी झेंगली म्हणाल्या. विशेष म्हणजे याआधी ‘ऑपरेशन 5 आईज’ने वुहान लॅबमध्ये वटवाघूळावर संशोधन सुरू असून कोरोनापेक्षा घातक व्हायरस येथे तयार होत असल्याचा दावा केला होता.

विज्ञानवादी राजकारण
शी झेंगली पुढे म्हणाल्या की, व्हायरसवर होत असलेल्या संशोधनाबाबत सरकार आणि शास्रज्ञ यांच्यात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. चीनवर सध्या कोरोना बाबत जगाला उशिरा माहिती दिल्याचा आरोप होत आहे. याबाबत शी झेंगली यांनी प्रतिक्रिया देताना यास ‘विज्ञानवादी राजकारण’ असे म्हटले आहे.

अमेरिकेचा आरोप फेटाळला
कोरोनामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. कोरोना व्हायरस चीनच्या वुहान लॅबमधून पसरला असा आरोप अमेरिका करत आहे. मात्र चीनने सातत्याने या आरोपांचे खंडन केले आहे. शी झेंगली यांनी देखील अमेरिकेचे आरोप फेटाळले आहेत. आम्ही ज्या व्हायरसवर काम करत आहोत त्याचे जेनेटिक्स कोरोना व्हायरसशी मिळतेजुळते नसल्याचे झेंगली यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या