कोरोनामुळे वीरमरण आलेल्या तिघा पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 लाखांची मदत

कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा संसर्ग होऊन वीरमरण आलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते ‘सानुग्रह’अनुदानातून प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. जालिंदर सुपेकर, डॉ. संजय शिंदे उपस्थित होते.

कोरोनाच्या लढ्यात वीरमरण पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला राज्य शासनाकडून सानुग्रह अंतर्गत 50 लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पुणे वाहतूक शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश दळवी, वानवडी पोलीस ठाण्यातील हवालदार विनोद पोतदार (वय 51) आणि विशेष शाखेत कर्तव्यास असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान निकम (वय 55) यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश वितरित करण्यात आला. शहर पोलीस दलातील जवळपास 1 हजार 336 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये 9 जणांना वीरमरण आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या