मोठ्या धक्क्यानंतर इटलीला दिलासा; दोन दिवसात मृतांचा आणि संक्रमितांच्या संख्येत घट

1138

कोरोनाचा सर्वाधिक फटका इटली, इराण, अमेरिकेला बसत आहे. कोरोनामुळे इटलीत सर्वाधिक सहा हजार जणांचा मृत्यू झाला आहे. दररोज कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. एवढ्या मोठ्या धक्क्यानंतर इटलीला आता थोडा दिलासा मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून इटलीमध्ये मृतांचा आकडा कमी झालाआहे. तसेच करोना रुग्णांच्याही संख्येत घट होत आहे. हा आकडा कमी होत राहिल्यास इटलीतील कोरोना संक्रमण लवकरच घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सध्या जगातील 195 देशात कोरोनाचे रुग्ण आहेत. यात इटलीने चीनलाही मागे टाकले आहे . जगभरात आतापर्यंत सुमारे 4 लाख लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. यापैकी एक लाख लोकांवर उपचार करुन रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा 16 हजारपेक्षा जास्त आहे. इटलीतील मृतांचा आकडा चीनपेक्षाही जास्त आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 6077 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, इटलीत गेल्या दोन दिवसात मृतांची संख्या कमी झाली आहे. शनिवारी इटलीत तब्बल 793 लोकांचा मृत्यू झाला होता. या आकडेवारीनंतर जगभरात प्रचंड दहशत पसरली होती. शनिवारी 793, रविवारी 651 आणि सोमवारी 601 मृत्यू झाले आहेत. मृतांच्या संख्येतील घट कमी असली तरी इटलीसाठी हा मोठा दिलासा आहे. इटलीमध्ये सोमवारी करोनाचे 4789 नवे रुग्ण आढळून आले. तर रविवारी हा आकडा 6557 एवढा होता. त्यामुळे करोनाबाधितांचाही आकडा कमी होत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसात संसर्गाचा आकडा कमी होत आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे इटलीतील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या