धारावीत 14 दिवसात उभे राहिले 200 बेडचे कोरोना हेल्थ सेंटर; सर्व बेड ऑक्सिजन बेड होणार

604

धारावीच्या महाराष्ट्र नेचर पार्क लगतच्या जागेत महापालिकेने अवघ्या 14 दिवसांत 200 बेडचे अत्याधुनिक असे फक्त कोरोना रुग्णांसाठी कोरोना आरोग्य केंद्र (DCHC) बनवून तयार केले. हेल्थ सेन्टरमधील सर्व बेड हे ऑक्सिजन बेडमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या या केंद्राची पाहणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आणि समाधान व्यक्त केले.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी परिसर ओळखला जातो. अत्यंत दाटीवाटीने वेढलेली घरे असल्यामुळे कोरोनाचा प्रसारही या परिसरात वेगाने झाला. धारावीची गरज लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र नेचर पार्क’ आणि ‘बेस्ट बस डेपो’ लगतच्या एका जागेत 200 खाटांचे ‘समर्पित कोविड आरोग्य केंद्र’ उभारण्याचे काम 18 मे 2020 रोजी सुरू करण्यात आले. त्यानंतर साधारणपणे केवळ 14 दिवसात हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले व तेथे आवश्यक त्या आरोग्यविषयक सोयीसुविधादेखील कार्यान्वित करण्यात आल्या. सुरुवातीला या ठिकाणी 100 ‘ऑक्सीजन बेड’ व 100 सामान्य बेड याप्रमाणे एकूण 200 बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. तथापि, या अनुषंगाने आजच्या पाहणी भेटीदरम्यान राजेश टोपे यांनी या आरोग्य केंद्रातील सर्व 200 ‘बेड’ हे ‘ऑक्सीजन बेड’मध्ये रूपांतरित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता या आरोग्य केंद्रातील सर्व बेड ‘ऑक्सीजन बेड’ मध्ये रूपांतरित करण्यात येत असून ही कार्यवाही उद्यापर्यंत पूर्ण होईल, अशीही माहिती जी/उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वालही उपस्थित होते.

अशा असतील सुविधा

आरोग्य केंद्रात 3 पाळ्यांमध्ये 10 डॉक्टर्स, 15 नर्सेस, 30 वाॅर्डबाॅय अव्याहतपणे कार्यरत राहणार आहेत. त्यासोबतच याठिकाणी एक रुग्णवाहिकादेखील 24 तास तैनात असणार आहे. याव्यतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरा, आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे व साधन सामग्री, औषध गोळ्या इत्यादी बाबीदेखील या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.‌

जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन पुरवठा

जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयात मागील आठवडाभरात झालेले मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किंवा सदोष ऑक्सिजन पुरवठ्यामुळे झालेले नाहीत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची योग्य व पुरेपूर काळजी घेऊन त्यांना आवश्यक ते औषधोपचार देण्यात येत आहेत. ज्या रुग्णांना ऑक्सिजन आवश्यक आहे, त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळेल, याची खात्री करण्यात येत आहे. कोरोना बाधित रुग्णांची गरज तसेच भविष्याची आवश्यकता लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा कमी पडू नये, यासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभारण्याचीही कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ऑक्सिजन कमतरतेमुळे किंवा सदोष ऑक्सिजनमुळे रुग्ण दगावल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, प्रसारित झालेली माहिती ही चुकीची आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता असल्याचे वृत्तदेखील निराधार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या