एप्रिल 2021 पर्यंत ‘या’ देशातील सर्व नागरिकांना मिळणार कोरोनाची लस

जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी अनेक देशात लस विकसित करण्यात येत आहे. या लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून लवकरच लस उपलब्ध होणार आहे. लसनिर्मिती झाल्यावर ती कशाप्रकारे वितरीत करायची याबाबत एका देशाची योजना तयार असून पाच महिन्यात म्हणजे एप्रिल 2021 पर्यंत या देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे.

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसने (एनएचएस) एप्रिल 2021 पर्यंत सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी ब्रिटनच्या सरकारने वॅक्सिन रेग्युलेटरना फायजर वॅक्सिनचे मूल्यांकन करण्याची सूचना केली आहे. एनएचएसच्या योजनेनुसार ब्रिटनमध्ये जानेवारी अखेरीस सर्व वयाच्या नागरिकांना लस देण्याचे काम सुरू होणार आहे.

ब्रिटनमध्येही कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता ब्रिटनने अनेक कोरोना लसीचे संशोधन सुरू असलेल्या कंपन्याशी लस मिळवण्यासाठी करार केला आहे. लस उपलब्ध झाल्यावर नागरिकांना लस देण्यासाठी केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. जे नागरिक या केंद्रापर्यंत प्रवास करू शकत नाहीत, त्यांना लस देण्यासाठी आरोग्य कर्मचारी पाठवण्यात येणार आहेत.

ब्रिटनमध्ये डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लसीचे 70 लाख डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सुमारे 75 टक्के नागरिक लस घेण्यासाठी केंद्रापर्यंत येतील असा एनएचएसचा अंदाज आहे. केअर होम राहणाऱ्या सर्व नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. केअर होममधील कर्मचारी, तेथे राहणारे नागरिक, आरोग्यसेवक आणि 70 वर्षांवरील नागरिक यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.

या सर्वांना कोरोना लस दिल्यानंतर 65 ते 70 वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात 50 ते 65 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. तर 18 ते 50 वयोगटातील नागरिकांना मार्चपर्यंत लस देण्यात येणार आहे. अशाप्रकारे एनएचएसने एप्रिलपर्यंत सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याची योजना आखली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या