कोरोनामुळे 21 वर्षीय फुटबॉल प्रशिक्षक; फ्रान्सिस्को गार्सिया याचे निधन

कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच मंगळवारी क्रीडाक्षेत्रातील एका व्यक्तीवर काळाने घाला घातला आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे स्पेनचा 21 वर्षीय प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याचे निधन झाले.

फ्रान्सिस्को गार्सिया हा ऍटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबच्या कनिष्ठ संघाचा व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. त्याच्या शरीरामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात येत होते, पण त्याची कोरोनाची झुंज अपयशी ठरली. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेला तो सर्वात युवा व्यक्ती ठरला आहे.

स्पॅनिश फुटबॉल क्लबच्या 35 टक्के खेळाडूंना कोरोनाची लागण

स्पेनमधील व्हॅलेंसिया या फुटबॉल क्लबमधील खेळाडू व कर्मचारी यांच्यापैकी 35 टक्के व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या फुटबॉल क्लबच्या प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. सर्वांची चाचणी घेण्यात आल्यानंतर ते कोरोनाने बाधित असल्याचे समजले. या सर्वांनाच विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या