आजी, आजोबांसाठी…

>> डॉ. सतीश नाईक, मधुमेह तज्ञ

कोरोनामुळे बाहेर न पडण्याचे पथ्य सगळ्यात जास्त पाळावे लागले आणि लागते आहे ते आजी–आजोबांना. यामुळे अनेक आनंददायी गोष्टींपासून ते वंचित झाले आहेत… त्यांच्या आनंदासाठी काय करता येईल…

काही लोकं ऐंशीव्या वर्षीदेखील ठणठणीत असतात आणि ज्यांना साठाव्या वर्षी हार्ट, किडनी अशा काही गोष्टी असतात अशा लोकांना आपण वेगवेगळे वागवले पाहिजे. ज्यांचे आरोग्य चांगले आहे त्यांना कदाचित कोविडमुळे काहीच होणार नाही. याउलट ज्यांना ब्लड प्रेशर, हार्टच्या समस्या, मधुमेह किंवा इतर कारणास्तव अन्य कुठली औषधं सुरू आहेत या सगळ्यामुळे जरी ते पासष्टीचे असतील तरी त्यांना धोका होऊ शकतो. ज्येष्ठ झालो म्हणून आपल्याला कोविड लवकर होऊ शकतो का असा प्रश्न असतो. कोविड कोणालाही आणि कुठल्याही वयाला होऊ शकतो. मूळ मुद्दा जो आहे याने होणाऱया समस्या, जिवाला होणारा धोका. पण ते कुठल्याही आजारपणाच्या बाबतीत शक्य आहे. केवळ कोविडच नव्हे तर या व्यक्तींना व्हायरल न्यूमोनिया झाला, फ्लू झाला किंवा इतर कुठलाही आजार झाला तर त्याची जी भीती असेल ती वाढत्या वयाप्रमाणे जास्त असेल. फक्त वय न धरता त्याच्यामुळे त्यांना काही समस्या आहेत हे पाहायला हवे. त्यानंतर त्यांना कोविड होण्याची शक्यता सर्व लोकांप्रमाणेच आहे.

कोविडमुळे ज्येष्ठांना बाहेर मोकळे फिरता येत नाही. फिरणे जे आहे त्याचा संबंध काही ठरावीक आजारांशी आहे. त्यामुळे झोपून, बसून गुडघेदुखी, कंबरदुखी अशा गोष्टी होऊ शकतात त्यासाठी घरच्या घरी व्यायाम करणे गरजेचे असते. व्यायाम याचा अर्थ आपले स्नायू हलले पाहिजेत. आपल्या शरीराचे वजन घेऊन आपण चालतो, धावतो ते आपल्या पायांच्या दृष्टिकोनातून वेटलिफ्टिंग केल्यासारखे असते. पण ज्यांना चालायला बाहेर जायला मिळत नाही अशा व्यक्तींनी पायाला हलकं वजन बांधून घरात व्यायाम करावा. दुसरी गोष्ट म्हणजे शाळेत आपण ज्या कवायती करत होतो त्या घरात करणं सहज शक्य आणि सोपे आहे. घर मोठं असेल तर घरात येरझाऱया घालून व्यायाम करता येईल. मुळात आपल्या शरीरातले वेगवेगळ्या गटातले स्नायू हलते ठेवणे याला आपण व्यायाम समजले पाहिजे. दुसरा पर्याय सोसायटीतील गच्ची असते किंवा दारासमोर थोडी मोकळी जागा असते तिथे व्यायाम करायचा. एवढेच नाही तर गार्डन सुरू केली आहेत तिथे जाऊन व्यायाम करायला हरकत नाही. त्यांनी जर सुरक्षित अंतर राखलं, मास्क नीट घातलं, आल्यानंतर हात-पाय साबणाने स्वच्छ धुतले , बाकी कशाला स्पर्श न करता चालले तर काहीही अडचण येणार नाही. फक्त आता पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःची काळजी अशी घ्यावी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शिवाय त्यांना तोल सांभाळता येत नसेल तर सोबत काठी असणे जरूरीचे आहे. कारण कुठे पडले तर आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात त्या मोठय़ा असतात.

एखादं फळ खाल्लं तर ते अख्खं खायला हवं. फळांचा रस केल्यावर त्या फळांचा चोथा आपण टाकून देतो. त्या चोथ्यात जास्तीत जास्त जीवनसत्त्व असतात. त्यामुळे अख्खी फळं जास्त फायदेशीर असतात. जीवनसत्त्व ‘क’ घेतलं, फळं जास्त खाल्ली तर कोविड बरा होईल किंवा कोविड होणार नाही असा गैरसमज आहे. कोविड शरीरात जाऊ शकतो. त्यामुळे ताबडतोब काहीतरी खाईन आणि लगेच रोगप्रतिकारशक्ती वाढेल असे होत नाही. पण एकंदरीतच चांगल्या आरोग्यासाठी ऋतुमानानुसार फळं, पालेभाज्या, वेगवेगळ्या प्रकारची सॅलड खाणं याचा आरोग्यासाठी नक्कीच फायदा होतो.

कोविड हा एखाद्या फ्लू सारखाच आहे. त्यामुळे पहिले पाच दिवस तो वायरस शरीरात प्रवेश करतो. मोकळ्या नाकाला वास न येणं हे कोविडचं पहिलं लक्षण असू शकतं. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या संपर्कातील कोणालाही अशा प्रकारचे लक्षण दिसलं तर त्यांनी स्वतःला त्या व्यक्तीपासून लांब ठेवावे. त्यांच्यापर्यंत तो व्हायरस पोहोचू नये हा विचार पहिल्यांदा आला पाहिजे. पुढचे दहा दिवस शरीरात ताप, कोरडा खोकला ही लक्षणं दिसतात. बऱयाचदा साठ टक्के लोकांमध्ये ही लक्षणं संपून जातात. त्याच्यानंतर पुढे त्या आजाराची काहीही प्रगती होत नाही. मग दहाव्या दिवसाच्या आसपास काही लोकांना दम लागायला लागतो. ज्यांना दमा नाही, काही नाही त्यांना दम लागला हेसुद्धा लक्षण कोविडचे आहे. यावेळेला त्यांनी ऑक्सिजन तपासला पाहिजे. शरीरातलं ऑक्सिजनचे प्रमाण 95 च्या वर असणे गरजेचे आहे. ते कमी कमी होत असल्यास रुग्णांनी ताबडतोब रूग्णालय गाठलं पाहिजे. स्वतःची कोविड टेस्ट ताबडतोब करून घेतली पाहिजे. ऑक्सिजनकडे लक्ष दिले पाहिजे. पंधरा टक्के लोकांमध्ये अचानक त्यांची तब्येत खूप बिघडते ती बिघडायला लागली तर त्यांनी शंभर टक्के चांगल्या ठिकाणी ऍडमिट असलं पाहिजे. चौदा टक्के लोकांमध्ये ही रासायनिक उलथापालथ मोठय़ा प्रमाणात सुरू होते. ही उलथापालथ हार्ट, किडनी याच्यावर परिणाम करते. त्यामुळे माणसे दगावतात ती आपल्या शरीरात इंद्रियांवर होणाऱया परिणामांमुळे.

मनाचे स्वास्थ्य

 • केवळ कोविड नव्हे एरवीसुद्धा ज्येष्ठांनी आपल्या समवयस्क लोकांशी संपर्कात राहायला हवे.
 • आवडते छंद जोपासा
 • मनोरंजनपर कार्यक्रम पाहण्याकडे भर द्यावा.
 • वर्तमानपत्रे वाचावीत.
 • आवडते संगीत हा एक चांगला पर्याय आहे.
 • नवीन झाडे लावा, त्यांना जोपासा.
 • एखाद्या ठिकाणी बरीच वर्षे काम केले, त्याचे चांगले ज्ञान आहे तर इतरांना त्याची माहिती द्या. त्याचा समाजाला कसा उपयोग होईल ते पहावे.काय काळजी घ्याल
 • घरात एखादी व्यक्ती बाहेर जात असतेच त्यामुळे त्या व्यक्तीपासून दूर राहणं.
 • नियिमत ऑक्सिजन तपासणे, दिवसातून तीन ते चारवेळा ऑक्सिजन तपासले पाहिजे.
 • ऑक्सिजन 95च्या खाली जायला लागले तर ताबडतोब रुग्णालय गाठले पाहिजे.
 • ज्यांना ब्लडप्रेशर आहे, मधुमेह, हार्टचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी चुकूनही त्यांची औषधे बंद करू नयेत.
 • मधुमेहींनी शुगर नियमित तपासायला हवी. मधुमेहींनी घरातच शुगर तपासायचे ग्लुकोमीटर मशीन ठेवायला हवे, त्यांना बाहेर जायची गरज नाही.
 • प्रत्यक्ष दवाखान्यात जाण्यापेक्षा डॉक्टरांशी टेली कन्सल्टेशन घेणे फायदेशीर आहे.
आपली प्रतिक्रिया द्या