हनीमूनवरून येताच पतीला कोरोनाची लागण, पत्नीची माहेरी धूम; आरोग्य विभागाची पळापळ

प्रातिनिधिक फोटो

एकीकडे कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी लोक सावधानता बाळगत असताना आग्रामध्ये सर्वांच्या तोंडचे पाणी पळवणारी घटना घडली आहे. आग्रा येथील एक महिला पतीसोबत हनीमूनसाठी इटली येथे गेली होती आणि नुकतीच बंगळुरूला परत आली. इटलीवरून आल्यानंतर वैद्यकीय चाचणीमध्ये पतीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच, पत्नीने माहेरी धूम ठोकली आहे. विशेष म्हणजे या महिलेलाही आयसोलेट करण्यात आले होते. मात्र हजारो लोकांची सुरक्षा धोक्यात घालून ही महिला आयसोलेशनमधून पळाली आणि विमानाने दिल्ली आणि तिथून ट्रेनने माहेरी आग्रा येथे पोहोचली. याची माहिती मिळताच आरोग्य विभागाची झोप उडाली असून या महिलेचा शोध सुरू आहे.

इटलीवरून परत आल्यानंतर महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर महिलेलाही आयसोलेट करण्यात आले होते. परंतु ही महिला 8 मार्चला बंगळुरूहून विमानाने दिल्लीला आली आणि तिथून रेल्वेने आपल्या आई-वडिलांकडे आग्रा येथे गेली. आरोग्य विभागाचे अधिकारी या महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा ती घरातील आठ सदस्यांसोबत आढळून आली. सुरक्षेचा उपाय म्हणून या सर्वांना आयसोलेट करण्यात आले, मात्र यास सर्वांनी नकार दिला. यानंतर दंडाधिकारी आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले, तेव्हा कुठे या कुटुंबाने माघार घेतली. परंतु यादरम्यान ही महिला आणि त्यांचे कुटुंबीय अन्य कोणाच्या संपर्कात आले होते का याचाही आरोग्य विभाग शोध घेत आहे.

Corona Virus एका दिवसात 250 जणांचा मृत्यू, इटलीमध्ये हाहा:कार

आग्राचे सीएमओ मुकेश कुमार वत्स यांनी सांगितले की, आरोग्य पथक महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या वडिलांनी मुलगी बंगळुरूला परतल्याची खोटी माहिती दिली. परंतु दंडाधिकाऱ्यांनी याची दखल घेतल्यानंतर आरोग्य विभागाला महिलेच्या घरात प्रवेश मिळाला आणि यानंतर सर्व कुटुंबीयांना रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. सध्या या महिलेला एसएन मेडीकल कॉलेजच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

पतीला कोरोनाची लागण
रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, फेब्रुवारीमध्ये या दाम्पत्याचा विवाह झाला होता. हनीमूनसाठी हे इटली येथे गेले होते आणि तेथून ग्रिस व फ्रान्सला गेले. 27 फेब्रुवारीला ते मुंबईला आले आणि तेथून बंगळुरुला. 7 मार्चला पतीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. यानंतर पती-पत्नीला आयसोलेट करण्यात आले. परंतु महिलेने ही बाब वडिलांनी सांगताच त्यांनी तिला माहेरी बोलावून घेतले. 8 मार्चला महिला बंगळुरूहून विमानाने दिल्लीला गेली आणि तेथून रेल्वेने आग्राला पोहोचली. सध्या ती कोणत्या-कोणत्या मार्गाने गेली याचा शोध घेतला जात आहे. या महिलेसोबत प्रवास करणाऱ्यांनाही संसर्ग झाला असल्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या