कोरोनाचे संक्रमण झाल्यावर केस का गळतात…संशोधकांना मिळाले उत्तर…

ताप, सर्दी, खोकला आणि घशात खवखवणे ही कोरोनाची लक्षणे आहेत. मात्र, प्रत्येक व्यक्तींमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येत आहेत. काहीजणांची गंध आणि चव ओळखण्याची क्षमता कमी होते. काहीजणांना अशक्तपणा जाणवतो. तर काही जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. कोरोनाचे संक्रमण झालेल्या अनेकांमध्ये केस गळण्याची समस्या दिसत असल्याचे दिसून आले आहे. त्यामागची कारणे संशोधकांनी शोधून काढली आहेत.

केस गळणे हेदेखील कोरोना संक्रमणाचे लक्षण असू शकते असे संशोधकांनी सांगितले. अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर डॉक्टर नताली लाम्बर्ट यांच्या पथकाने 1500 लोकांचे सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढला आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या 1500 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. तसेच कोरोनामुक्त झाल्यावरही बराच काळ त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसत होता. त्यातील अनेकांमध्ये केस गळण्याची समस्या दिसून आली होती.

आतापर्यंत संशोधकांनी कोरोनाची 25 लक्षणे शोधून काढली आहेत. केस गळणे हे त्यापैकीच एक लक्षण असल्याचे संशोधकांनी सांगितले. सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे आपल्याला दिसली नाहीत. फक्त काही दिवसात मोठ्या प्रमाणात केस गळायला लागले असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अनेकांनी सांगितले. ऑनलाईन पद्धतीने हे सर्वेक्षण करण्यात आले.

कोणत्याही आजारपणात केस गळण्याचा संबंध तणाव किंवा नैराश्य याच्याशी असतो. या स्थितीला टेलोजेन एफ्लुवियम म्हणतात. त्यामुळे तणावात असताना किंवा नैराश्य असतानाही केस गळण्याची समस्या जाणवते. मात्र, आजारपणात मोठ्या प्रमाणात केस गळतात. त्यामुळे केस गळणे हे कोरोना संक्रमणाचे एक लक्षण असल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाचे संक्रमण झाले की शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने कमी होते. तसेच शरीरातील पोषक घटकही कमी होतात. यामुळे शरीरात अशक्तपणा आल्याने केस गळण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोरोना व्हायरस आणि केस गळणे याबाबत अधिक संशोधन करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. आजारपणानंतरही केस गळतात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांनी ताणतणावापासून दूर राहवे. त्याचप्रमाणे सकस आहार घेणे आणि शरीराला पोषकतत्वे मिळणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी सांगितले. लोह, विटामीन सी आणि विटामीन डी असलेल्या गोळ्या नियमित घ्याव्यात. त्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढली की केसगळतीची समस्या कमी होत असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या