केरळमध्ये कोरोनाचा कहर, दररोज 5500 हून अधिक कोरोनाग्रस्त आढळल्याने टेन्शन कायम

हिंदुस्थानात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर घट पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या नव्या प्रकरणांची संख्या 100 हून कमी असल्याचे समोर आले आहे. मात्र केरळमध्ये उलटे चित्र पाहायला मिळत आहे. इथे कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून दररोज जवळपास 6000 केस आढळत आहेत. केरळचा पॉझिटिव्हिटी रेट 11 टक्के इतका आहे.

आरोग्य मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत बुधवारी हिंदुस्थानात कोरोनाची 14,301 नवी प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये एकट्या केरळमधून 5659 नवी प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे केरळमधील संक्रमित प्रकरणांची संख्या ही वाढून 9,05,591 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात 5,006 कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे केरळमधील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 8,29,452 इतकी झाली आहे.

केरळमध्ये कोरोनामुळे आणखी 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 3,663 इतकी झाली आहे. सध्या केरळमध्ये 72,234 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. इथे 24 तासात 51,130 नमूने तपासण्यात आले आहे आणि त्यातून संक्रमणाचा दर 11.07 टक्के असल्याचे लक्षात आले आहे. केरळमध्ये आतापर्यंत 94,00,749 नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली आकडेवारी

हिंदुस्थानातील एकूण कोरोना प्रकरणे – 1,07,01,193
अॅक्टिव प्रकरणे – 1,73,740
कोरोनामुक्तांची संख्या – 1,03,73,606

महाराष्ट्रात 2,171 नवी प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 20,15,524 इतकी तर कोरोनामुक्तांची संख्या 19,20,006 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या