मुंबईत 1700 ‘कोविड योद्धा’! 242 डॉक्टर्स, 550 नर्स, आरोग्य सेवकांचा समावेश

1211

मुंबई महानगरपालिकेच्या कोरोनाविरोधातील लढ्यात आता १७०० ‘कोविड योद्धा’ उतरणार आहेत. यामध्ये 242 डॉक्टर्स, 550 नर्स आणि इतर आरोग्य सेवकांचा समावेश आहे. पालिकेकडे नोंदणी केलेल्या या कोविड योद्ध्यांना सोमवारपर्यंत काम करणे शक्य असणारे ‘कोरोना हेल्थ सेंटर’ निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हे ‘कोविड योद्धा’ आपली सेवा बजावण्यास तयार झाले आहेत.

मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवेत काम केलेल्या लोकांना कोरोनाविरोधातील लढ्यात राज्य सरकार, महानगरपालिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर काही दिवसांतच राज्यात तब्बल 21 हजारांवर अर्ज आले होते. यामध्ये मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काम करण्यासाठी 3500 इच्छुकांकडून अर्ज आले होते. यामध्ये मेडिकल विभागातील 1700 अर्ज पात्र ठरल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी दिली. यामध्ये अ‍ॅलोपॅथी डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, हाऊस किपिंग सुविधा देणार्‍यांकडून ‘कोविड योद्धा’ उपक्रमासाठी उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पालिकेला कुशल मुनष्यबळ मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘कोविड योद्धा’ उपक्रमात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांना त्यांच्या कौशल्यानुसार काम देण्यात येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेबरोबरच निर्जंतुकीकरण, जनजागृती अशी सेवाही ‘कोविड योद्धा’ करणार आहेत.

कोरोना हेल्थ सेंटरवर होणार नियुक्ती

  • इच्छुक कोरोना योद्ध्यांकडून मिळणार्‍या प्रतिसादानुसार त्यांची पालिकेच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या कोरोना हेल्थ सेंटरवर नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये सेव्हन हिल्स, एनएससीआय डोम वरळी, बीकेसी, नेस्को सेंटर आदी ठिकाणी नियुक्ती केली जाईल अशी माहितीही अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी दिली.
  • कोरोना योद्ध्यांसाठी पालिका सर्व प्रकारच्या सुविधा देणार आहे. ज्यांना सेवा बजावून घरी जायचे आहे त्यांच्या प्रवासाची व्यवस्था किंवा गरजेनुसार कामाच्या ठिकाणी राहणे शक्य असेल त्यांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था पालिकेकडून करण्यात येणार आहे.

मानधनही मिळणार

कोविड योद्ध्यांना पालिका प्रशासन कंत्राटी कामगारांच्या धर्तीवर मानधन देणार आहे. यामध्ये डॉक्टर्सना सुमारे 70 ते 80 हजार रुपये, नर्सना 30 हजार आणि वॉर्ड बॉयना 20 हजारांचे मानधन महिना दिले जाईल. या शिवाय कोविड योद्धा म्हणून काम करणारे लॅब टेक्निशियन, हाऊस कििंपंग आणि सर्वसामान्य स्वयंसेवकांनाही योग्य मानधन देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या