पोलिसांची परवड! कधी कोरोना टेस्टला उशीर, तर कधी व्हेंटिलेटर मिळत नसल्याने जातोय जीव!

574

कोरोनाचा कहर सुरू असताना जनतेच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या पोलिसांची मात्र मुंबईत परवड होत आहे. कधी नॉन कोविड रुग्णालयांकडून लक्षणे असतानाही कोरोना टेस्ट करण्यास उशीर केल्याने बळावणारा आजार तर कधी पोलिसांसाठी उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयात वेळेवर व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने नाहक जीव जाण्याचे प्रकारही घडत आहेत.

राज्यात 28 मेपर्यंत 22 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.यामध्ये एकटया मुंबईत 14 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. नुकताच एका 52 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलच्या बाबतीत चारकोप येथे असाच प्रकार घडल्याने हा प्रश्न पुन्हा ऐर णीवर आला आहे. या पोलीस कर्मचार्याची प्रकृती बिघडल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. या पोलिसाला तापासह काही कोरोना संशयित लक्षणे होती. मात्र संबंधित नॉन कोविड रुग्णालयात तब्बल आठ दिवस टायफॉइडवर उपचार करण्यात आले. हा वेळ गेल्यामुळेच संबंधित पोलिसामध्ये कोराना आणखीनच बळावल्याची शक्यता आहे. यानंतर एका शासकीय रुग्णालयात केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. मात्र रिपोर्ट मिळाल्यानंतरही व्हेंटिलेटर वेळेत मिळाला नसल्याने त्याचा मृत्यू झाला.

कोरोना संशयित आणि कोविड लक्षणे असलेल्या रुग्णांना नॉन कोविड खासगी रुग्णालयांनी दाखल करून न घेता कोरोना हेल्थ सेंटरमध्ये पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना काही खासगी रुग्णालयांमध्ये जर कोविड लक्षणे असतानादेखील रुग्णांना अ‍ॅडमिट करून उपचार करणे आणि कोरोनाची टेस्ट करण्यास दिरंगाई करण्याचे प्रकार सुरू असल्यास निश्चितच चौकशी करून कारवाई केली जाईल.
– डॉ. तात्याराव लहाने, राज्याच्या आयुष टास्क फोर्सचे प्रमुख

नॉन कोविड खासगी रुग्णालयांकडून कोरोनाची लक्षणे असतानाही चाचणी करण्यास दिरंंगाई करण्यात आल्याचे प्रकार घडत असल्यास हा प्रकार गंभीर आहे. असा प्रकार घडल्याचे समोर आल्यास तातडीने संबंधित खासगी रुग्णालयाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. – किशोरी पेडणेकर, महापौर

आपली प्रतिक्रिया द्या