राज्यात 6 लाख 16 हजार व्यक्ती क्वारंटाईन; विविध गुन्ह्यांसाठी 8 कोटी 23 लाखांचा दंड – गृहमंत्री

610

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 95 हजार 997 पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. 6 लाख 16 हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे 22 मार्च ते 19 जून या कालावधीत कलम 188 नुसार 1 लाख 32 हजार 933 गुन्हे नोंद झाले असून 27 हजार 159 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 8 कोटी 23 लाख 40 हजार 331 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 275 घटना घडल्या. त्यात 854 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

100 नंबर-1 लाख 3 हजार  फोन

पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,03,922 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा 734 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 6,16,745 व्यक्ती Quarantine  आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1335 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 83,482 वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 30 पोलीस व 1 अधिकारी अशा एकूण 31, पुणे 3, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 3, ए.टी.एस. 1, मुंबई रेल्वे 2, ठाणे ग्रामीण 2, जळगाव ग्रामीण 1, पालघर 1 अशा 45 पोलिस बांधवांना  वीरगती प्राप्त झाली. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या 113 पोलीस अधिकारी व 876 पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रिलिफ कँम्प

राज्यात सध्या एकूण 109 रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास 3,548 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोशल डिस्टेन्सिंग पाळा

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या