कोरोना संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, 31 डिसेंबरपर्यंत राहणार लागू

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसानुदिवस वाढत आहे. अशातच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत दररोज 7 हजारहून अधिक कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. सणांच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी हे संसर्ग वाढण्यामागे मोठं कारण असल्याचं बोललं जात आहे. अशातच केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोना संदर्भात बुधवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गृह मंत्रालयाने परिस्थितीची देखरेख, नियंत्रण आणि सावधगिरीचे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.

गृह मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कडक उपाययोजना, विविध कामांवर एसओपी आणि गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

कंटेनमेंट झोनमध्ये केवळ आवश्यक गोष्टीनाच परवानगी देण्यात येणार आहे. स्थानिक जिल्हा पोलिस व पालिका अधिकारी हे सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असतील. तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करतील.

आपली प्रतिक्रिया द्या