कोरोना रुग्णालयांत 511 कर्मचारी नियुक्त; रद्द केलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांनाही पालिकेने दिली पुन्हा संधी

717

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील कोरोना रुग्णालये, कोरोना सेंटर्स, अन्न पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे कामगार आणि कक्ष परिचर पदासाठी 511 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता यात 2017-18 साली रद्द केलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये आणि कोरोना सेन्टरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या कोरोना रुग्णांची देखभाल, आयसोलेशन आणि कोरेन्टाईन कक्ष, नवीन रुग्णालये-कक्षाची उभारणी करणे, कोरोना चाचणी करणे, कोरोना बाधित आणि गरजूंना अन्नपुरवठा करणे यासाठी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर, कामगार आणि कक्ष परिचर पदाच्या एकूण 511 जागा भरण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या विविध खाती, विभाग आणि रुग्णालयांमध्ये 2017-2018 साली कामगार/कक्ष परिचर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांव्यतिरिक्त रद्द करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील 146 उमेदवारांना आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा संधी देण्यात आली आहे तर 365 जणांची भरती ही मलनिस्सारण खात्याकडून करण्यात आली आहे. पालिकेच्या रुग्णालयात कामगार आणि कक्ष परिचर पदासाठी 500 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, तेवढी पदे रुग्णालयात शिल्लक नसल्यामुळे ही पदे मलनिस्सारण खात्यांतर्गत भरली गेली आहेत. या 365 जणांची नेमणूक ही कोरोना रुग्णालयांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णालये आणि कोरोना सेंटर्ससाठी एकूण 511 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, विशेष बाब म्हणून कोरोना रुग्णालयांसाठी ही भरती केली गेली आहे. या नियुक्तीबाबत स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी पालिका प्रशासन नंतर घेईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

नवीन भरती प्रक्रिया वेळखाऊ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पालिका रुग्णालयांतील मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मात्र, नवीन भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवणे, परीक्षा घेणे, निवड करणे यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्यामुळे पालिका प्रशासनाने साथ प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा या अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करत ही भरती केली

आपली प्रतिक्रिया द्या