1952 जणांना डिस्चार्ज, उरले फक्त 166 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; ‘धारावी कोरोना लढ्या’चा जगात डंका!

835

आशियातील सर्वात मोठ्या आणि प्रचंड दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीने आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण 2359 कोरोनाबाधितांमधील तब्बल 1952 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने या ठिकाणी आता फक्त 166 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. विशेष म्हणजे एका वेळी ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या धारावीत कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामाचा जागतिक आरोग्य संघटनेने गौरव केला आहे. ‘कोरोना थोपवला जाऊ शकतो!’, हे धारावीने दाखवून दिल्याचे ट्विट ‘डब्ल्यूएचओ’ने केले आहे.

मार्चमध्ये मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर दहा लाख दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीत क्लोज काँटॅक्टमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. या भागातील 80 टक्के लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत असल्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका जास्त होता. दहा बाय दहाच्या रूमध्ये सुमारे आठ ते दहा लोक या ठिकाणी राहत असल्याने कोरोना कसा रोखणार असा प्रश्न होता. मात्र पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या प्रभावी कामामुळे आता धारावीने कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली असल्याचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. पालिकेच्या ‘मिशन धारावी’ला खासगी डॉक्टर, क्लिनिक, संस्था यांचेही बहुमूल्य सहकार्य मिळाले.

असे केले काम

– दाटीवाटीच्या धारावीत कोरोना रोखण्यासाठी ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चतु:सुत्रीनुसार काम करण्यात आले. यामध्ये 47 हजार 500 घरांत डॉक्टर व खासगी क्लिनिक पोहोचून स्क्रिनिंग, फिव्हर कॅम्प घेण्यात आले.
– धारावीत तब्बल 3.6 लाख नागरिकांचे स्क्रििंनग करण्यात आले. यामध्ये 8 हजार 246 ज्येष्ठांची तपासणी करून गरजेनुसार आवश्यक औषधोपचार करण्यात आले. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून 14 हजार 970 जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले.

जागतिक आरोग्य संघटना म्हणते…

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या न्यूझीलंड, व्हिएतनाम, इटली, स्पेन, कोलंबिया, थायलंड या देशांबरोबरच मुंबईतील दाटीवाटीच्या धारावीनेही उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध काम करीत कोरोना थोपवता येऊ शकतो हे दाखवून दिले आहे. जगभरात करोना रुग्णांची संख्या 1 कोटी 20 लाखांच्या वर गेली असून मागील सहा आठवड्यांत दुपटीहून अधिक रुग्ण वाढले आहेत. कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी योग्य नियोजनाने तो थोपवला जाऊ शकतो हे दाखवून देणार्‍या देशांमध्ये धारावीचे उदाहरणही असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस ग्रेब्रेसस यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंकडूनही कौतुक

धारावीत कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांच्याबरोबरच धारावीकर रहिवाशांनी दिलेले सहकार्य सर्वात महत्त्वाचे असल्याचे गौरवोद्गार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले आहेत. कोरोनामुक्तीसाठी हा लढा असाच सुरू ठेवून, कोरोनामुक्त होऊया! असेही त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या