विठ्ठलाच्या पायी थरारली वीट; अल्कोहोल आहे म्हणून सॅनिटायझरला वारकऱ्यांचा विरोध

राज्यातील जर धार्मिक स्थळे उघडली गेली तर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे लागेल. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्रीविठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन भाविक घेतात. त्यामुळे सॅनिटायझर वापरावे लागेल. मात्र अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरण्यास वारकरी संप्रदायाने विरोध केला आहे. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी मुखदर्शन घेऊ, नियमांचे पालन करू अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्यामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. पंढरपुरातील श्रीविठ्ठल-रखुमाई मंदिरही बंद आहे. मंदिर दर्शनासाठी उघडले तर कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. श्रीविठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेण्याची प्रथा-परंपरा आहे. देवाच्या पदस्पर्श दर्शनाचे महत्त्व आहे. पण एका भाविकाने पदस्पर्श दर्शन घेतले की लगेच देवाच्या पायावर सॅनिटायझर फवारावे लागणार आहे.

सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. अल्कोहोल हे वारकरी संप्रदायात निषिद्ध मानले जाते. त्यामुळे श्रीविठ्ठलाच्या पायावर सॅनिटायझर लावणे खपवून घेणार नाही, अशी भूमिका वारकरी-फडकरी-दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी घेतली आहे. श्रीविठ्ठलाच्या पायावर सॅनिटायझर फवारू नये याकडे कुंभारगावकर महाराज, लबडे महाराज, विनायक महाराज गोसावी आदींनीही मंदिर समितीचे लक्ष वेधले आहे.

मुखदर्शन दिले तरी चालेल

कोरोना संकट टाळण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन करून मुखदर्शन दिले तरी चालेल; पण श्रीविठ्ठलाच्या चरणावर अल्कोहोल असलेले सॅनिटायझर फवारू नये, असे वारकरी संप्रदायाचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या