कोरोनावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; लोकसभेत आयुष मंत्र्यांची फजिती

181
parliament

कोरोनाशी लढा देत असताना सरकारच्याच पातळीवर परस्परविरोधी भूमिका जाहीर केल्याबद्दल विरोधकांनी शुक्रवारी सरकारला लोकसभेत चांगलेच धारेवर धरले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची तर पुरेशी तयारी केलेली नसल्यामुळे चांगलीच फटफजिती झाली. एकीकडे पंतप्रधान नागरिकांना घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहेत, तर आयुष मंत्रालय कोरोनावर गोळ्या सुचवत आहे. हा विरोधाभास कसा, असा सवाल विरोधकांनी केला. त्यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ झाला.

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत काँग्रेसचे मनीष तिवारी, उत्तम रेड्डी आणि तृणमूल काँग्रेसच्या शताब्दी राय यांनी कोरोनावर रास्त प्रश्न विचारून सरकारची चांगलीच तारांबळ उडवली. आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे पुरेशा तयारीअभावीच सभागृहात आल्यामुळे त्यांची उत्तरे देताना चांगलीच धांदल उडाली. कोरोनाशी लढण्यासाठी सरकार नेमके काय करत आहे, असा सवाल मनीष तिवारींनी उपस्थित केला, तर उत्तम रेड्डी यांनी कोरोना झाला आहे की नाही याची तपासणी करण्याची यंत्रणा आपल्याकडे का नाही, असा प्रश्न विचारला. या सर्वच प्रश्नांना श्रीपाद नाईक नीटपणे उत्तरे देऊ शकले नाहीत.

राज्यसभेत कोरोनावरून मतैक्य

कोरोनावर मात करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारीच देशातील जनतेला केले होते. पंतप्रधानांच्या भूमिकेला सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आज राज्यसभेत समर्थन दिले. कोरोनाचा मुद्दा काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी उपस्थित केला होता, मात्र या मुद्दय़ावर आम्ही सर्वजण सरकारसोबत आहोत, असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय महामार्ग 66 च्या जमीनधारकांना मोबदला द्या; शिवसेनेची मागणी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 मध्ये जमिनी गेलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या शेतकऱयांचा प्रलंबित असलेला मोबदला तत्काळ मिळावा, अशी मागणी शिवसेनेने आज केली. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांनी यासंदर्भात केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱयांना जमिनीचा मोबदला प्रदीर्घ काळापासून मिळालेला नसल्याकडे त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱयांना फोन करून हा मोबदला तत्काळ अदा करा अशा सूचना केल्या. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात शेतकऱयांना ही रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश ताश्कंदमधील 38 डॉक्टर सुखरूप मायदेशी परतणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताश्कंदवरून 10 मार्चलाच मायदेशी परतणाऱया 38 डॉक्टरांचा समूह आता सुखरूपपणे मायदेशी परतणार आहे. या डॉक्टरांच्या मायदेशी परतण्यासाठी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत आणि खासदार राजन विचारे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन तशी विनंती केली होती. त्यानुसार त्यांना मायदेशी आणण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन जयशंकर यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या