पालिकेच्या ‘शीव’ रुग्णालयातील 150 ‘कोव्हिड योद्धा’ कोरोनामुक्त होऊन पुन्हा कामावर हजर

539

पालिकेच्या लोकमान्य टिळक शीव रुग्णालयातील तब्बल 50 डॉक्टरांसह 150 नर्स-आरोग्य कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी ही माहिती दिली. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असणार्‍या डॉक्टर्स-आरोग्य कर्मचार्‍यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पालिकेच्या विविध रुग्णालयांसह कोरोना हेल्थ सेंटरमध्ये पालिकेचे हजारो डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. या सर्व कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी पालिकेच्या माध्यमातून पीपीई किट, सॅनिटायझेशन अशा खबरदारीच्या सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. तरीदेखील अनेक वेळा कोरोनाबाधित रुग्णांच्या सततच्या संपर्कात असल्यामुळे अनेक डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होत आहे. यामध्ये पालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांसह इतर सर्व विभागातील कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. मेअखेरपर्यंत पालिकेच्या दीड हजारांवर कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून सुमारे 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

एकूण 352 जणांना लागण

पालिकेच्या शीव रुग्णालयात कोविड विभागात काम करणार्‍या एकूण 352 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 60 डॉक्टर्सचा समावेश आहे. संबंधितांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात क्वारेंटाइन करण्यात आले. आतापर्यंत यातील 50 डॉक्टर्ससह नर्स आणि आरोग्य कर्मचारी कोरोनामुक्त होऊन पुन्हा कामावर हजर झाले आहेत. तर इतर क्वारेंटाइन करण्यात आलेल्यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या