साडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत

आरोग्य विभागाने प्लाझ्मा बॅगचे दर निश्चित केले आहेत. यामुळे रुग्णांना परवडणाऱया दरात प्लाझ्मा उपलब्ध होणार आहे. कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढय़ा, रुग्णालये 5500 रुपयांहून अधिक किंमत घेऊ शकणार नाहीत, त्याचप्रमाणे सिटीस्कॅनसाठी यापुढे 2 हजार ते 3 हजार रुपयांपेक्षा अधिक दर आकारता येणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

खासगी रुग्णालयांत रुग्णांना किफायतशीर दरात हा प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी या प्लाझ्माचा प्रती डोसची किंमत निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ञ समिती गठीत करण्यात आली. या समितीने प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च व राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्या/विशेष चाचण्या यासाठी आकारण्यात येणाऱया सेवा शुल्क हे लक्षात घेऊन दर निश्चिती केलेली आहे. त्याचप्रमाणे सिटीस्कॅनचे दरही कमी करण्यात आले आहेत.

प्लाझ्माचे नवे दर

त्यानुसार प्लाझ्मा बॅग (200 मिली) 5500 रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर 1200 रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किंमतीव्यतिरक्त) तर केमील्युमीनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रति चाचणी कमाल दर 500 रुपये (प्लाझ्मा बॅग किंमती व्यतिरक्त) आकारण्यास मान्यता दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या