राज्यातील भाजप नेत्यांना ‘इंजेक्शन’ द्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे तक्रार

कोरोनाची लाट पुन्हा येत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना देत आहोत. मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जिवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत, अशी स्पष्ट तक्रार करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटात बेजाबदारपणे वागणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांना राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याचे ‘इंजेक्शन’ देण्याचीच मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मंगळवारी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाची लाट पुन्हा येत आहे. अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. एकीकडे आम्ही कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे काही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करीत आहेत, त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व कोरोना लाटेला आमंत्रण मिळू शकते. तेव्हा पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

किनाऱयावर नाव बुडू द्यायची नाही – पंतप्रधान

कोरोनावरील लस कधीपर्यंत येणार ते आम्ही ठरवू शकत नाही. याबाबत वैज्ञानिकच सांगतील. लसीची कुिंमत काय असेल, एक डोस द्यायचा की दोन हे अद्याप निश्चित झालेले नाही.

कोरोना संकटाच्या खोल समुद्रातून बाहेर पडून हिंदुस्थानची वाटचाल किनाऱयाकडे सुरू आहे. मात्र, आपल्याला कोणतीही ढिलाई करून चालणार नाही. जनतेने जागरूकता कायम ठेवून निष्काळजीपणा करू नये. कारण आपल्याला किनाऱयावर नाव बुडू द्यायची नाही, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

लस कुणाला, कधी, कशी मिळणार? राज्यात टास्क फोर्स स्थापन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरणाबाबत राज्याच्या तयारीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिटय़ूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. पण लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असल्याचे सांगून लसीची उपलब्धता, लसीची संख्या, लसीचे दुष्परिणाम, लसीचे परिणाम, लसीवरील येणारा खर्च व त्याचे वितरण याबाबतीत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्य सचिव अध्यक्ष

कोविड लस प्रभावीपणे निर्माण करून तिचे वितरण करणे, ती देण्याबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि त्या लसीची किंमत व प्रमाण ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. टास्क फोर्समध्ये वित्त, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. शशांक जोशी त्याचप्रमाणे जे.जे. आणि केईएम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागांचे प्रमुख सदस्य असतील.

आपली प्रतिक्रिया द्या