गर्भवती स्त्रियांनी घाबरू नये; काळजी घ्यावी, कोरोना काळात प्रसूतितज्ञांचा सल्ला

कोरोना काळात गर्भवती महिला घाबरतात. मात्र त्यांनी घाबरून जाऊ नये. गर्भवती महिलांनी स्वतःची व्यवस्थित काळजी घेतली तर कोणतीही अडचण येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या दुसऱया लाटेत आई होणे सुरक्षित आहे का? यावर मुंबईतील प्रसूतिशास्रीव स्त्रीरोगतज्ञ डॉ. मुकेश गुप्ता म्हणतात की, हा विषाणू नव्या अवतारात समोर येत आहे. त्याचे नवीन स्ट्रेन बाहेर येत आहेत. जर गर्भवती महिलांनी स्वतःची व्यवस्थित काळजी घेतली तर काहीच त्रास होणार नाही.

गर्भधारणेदरम्यान शरीराची प्रतिकारशक्ती बदलते. कोविड-19 पासून गर्भवती महिलांना अधिक धोका असतो. मग खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूत दाखल केले जाते. यामध्ये सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे पोटात वाढणाऱया बाळावर कोरोनाग्रस्त आईच्या संसर्गाचा परिणाम होत नाही. पण वेळेआधी प्रसूती होण्याच्या केसेस वाढल्या आहेत. मुंबईतील प्रसूतितज्ञांनी गेल्या वर्षभरात कडक सुरक्षा नियम पाळले आहेत. यामुळे सुरक्षित प्रसूती होण्यास मदत झाली आहे. गर्भवती स्त्रीयांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

टेलिकन्सल्टेशनवर दिला जातोय भर

मास्क लावणे, सामाजिक या त्रिसूत्रीचे गर्भवती महिलांनी पालन करावे. सध्याच्या संकटजन्य परिस्थितीत बरेच डॉक्टर्स टेलिकन्सल्टेशनवर भर देत आहेत. त्यामुळे नियमित तपासणीसाठी महिलेला वरचेवर बाहेर पडावे लागत नाही.

लंडनमधील वैद्यकीय मासिक ‘द लँन्सेट’मध्ये घेतलेल्या आढाव्यानुसार कोविड-19 मध्ये केवळ माताच नव्हे तर नवजात बाळांनाही धोका वाढला आहे. संशोधकांचे असे म्हणणे आहे की, साथींच्या रोगांमुळे इतर रुग्णांकडे किंवा आजारांकडे नकळत दुर्लक्ष होते. रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांची गर्दी असल्याने अनेक गर्भवती स्त्रीया तपासणीसाठी रुग्णालयात जायला घाबरतात. या भीतीच्या वातावरणामुळे गर्भवती स्त्रीयांमध्ये ताणही वाढला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या