महिला पोलिसाला शिविगाळ करुन धक्काबुक्की

1376
संचारबंदी आदेशाबाबत माहिती देणाऱ्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करुन त्यांना रस्त्यावर खाली पाडल्याची घटना लांजा शहरात घडली. याप्रकरणी शहरातील फकिरमहंमद हुसेन नेवरेकर (वय 35) या तरुणावर आदेश भंग केल्याप्रकरणी लांजा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांजा पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना संसर्ग विषाणूंच्या संदर्भात लागू केलेल्या जमावबंदी आणि संचारबंदी आदेशांच्या पालनाची जबाबदारी सर्वांची आहे. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवताना ठीकठिकाणी नाकेबंदी व गस्तीपथके तैनात केली आहेत. लांजा बाजारपेठेत शेट्ये बिल्डिंगसमोर वाहनांची पोलिस तपासणी करीत असताना खासगी कारचालक फकिरमहंमद हुसेन नेवरेकर याला लांजा पोलिस स्थानकाच्या महिला कर्मचारी सुगंधा हरेष दळवी यांनी थांबविले. त्या याठिकाणी आपले कर्तव्य बजावत होत्या. फकिरमहंमद नेवरेकर आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार (एम एच 06, ए एक्स – 1212) घेऊन लांजा बसस्थानकाच्या दिशेने जात असतानाच महिला पोलिस सुगंधा दळवी यांनी स्विफ्ट गाडी थांबविण्यात सांगितले. याचाच राग नेवरेकर याला आला. यातून महिला पोलिस दळवी आणि त्याच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. फकिरमहंमद नेवरेकर महिला पोलिस दळवी यांच्याशी हुज्जत घालू लागला. यावेळी त्याने महिला पोलिस दळवी यांना शिविगाळ, अंगावर धाऊन जाऊन धक्काबुक्की केली व रस्त्यावर खाली पाडले. यावेळी कर्तव्य बजावत असलेले इतर पोलिस कर्मचारीही त्याठिकाणी धाऊन आले. या घटनेची फिर्यादी स्वतः महिला पोलिस सुगंधा दळवी यांनी लांजा पोलिस स्थानकात दिली. यानुसार फकिरमहंमद नेवरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या