युद्ध कोरोनाशी… महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; महामुंबईसह पिंपरी–चिंचवड, पुणे, नागपूर महानगरं बंद!

2104

संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरात थांबण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी केलेल्या आवाहनानंतर अनेकांनी स्वयंस्फूर्तीने आस्थापने, दुकाने बंद केली. मात्र तरीही गर्दी पूर्ण ओसरलेली नाही. मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर यांसारख्या विमानतळांवर बाहेर गेलेले पर्यटक येत आहेत. त्या माध्यमातून कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढतच आहे. अशा परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह सर्व एमएमआर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथील खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील. सरकारी कार्यालये 25 टक्के उपस्थितीत चालविली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. निर्बंध फिरण्यासाठी नाहीत, तर घरी बसा आणि शांत रहा. अत्यावश्यक सेवांसाठीच्या कर्मचाऱयांना ये-जा करता यावी म्हणून रेल्वे, बससेवा सध्या बंद करण्यात येणार नाहीत; मात्र तरीही गर्दी पूर्ण ओसरली नाही तर शेवटी निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक, यू टय़ूब तसेच वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक देशातील पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जबाबदार अधिकारी आपापल्या जनतेशी बोलत आहेत. संपूर्ण जग हे जगण्यासाठी एक सेकंदही न थांबता धडपडत असतं. दुर्दैवाने अशी परिस्थिती आली आहे की संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरात थांबण्याची वेळ आली आहे. तरीही सर्वत्र एकच मोठा खबरदारीचा उपाय करायला सांगितला जातोय तो म्हणजे घरामध्ये रहा, शांत रहा.

जगण्यासाठी शांत राहणं, घरी राहणं महत्त्वाचं

जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त दुकानं तसेच खासगी अस्थापनांना बंद ठेवण्यास सांगितलं. काहींनी स्वयंस्फूर्तीने बंद केली. मात्र तरीही काही ठिकाणी ती सुरू होती. त्याचप्रमाणे नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड. या मोठय़ा शहरांमध्ये एअरपोर्टस् आहेत. बाहेरून गेलेले पर्यटक इथे उतरत आहेत. यामुळे या शहरांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकार निर्णय घेत आहे की, काल सरकारी कर्मचाऱयांची उपस्थिती 50 टक्क्यांवर आणली होती ती उपस्थिती आम्ही 25 टक्क्यांवर आणत आहोत. आपल्या पूर्ण राज्याचा भार हा 25 टक्के कर्मचारी घेतील. जीवनावश्यक वस्त्वूं्यतिरिक्त दुकानं बंद राहतील, सर्व खासगी कार्यालयेही 31 मार्चपर्यंत बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूंत किरणामाल, अन्नधान्याची दुकाने, दूधाचे स्टॉल, बँका चालू राहतील. जगण्यासाठी शांत राहणं, घरी राहणं महत्त्वाचं झालं आहे. त्याच्याखेरीज आपल्याकडे आता तरी पर्याय नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ट्रेन, बस बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठीचा कर्मचारी कसा ये-जा करणार?

काहींनी मला सांगितलं की मुंबईत गर्दी खूप होते, त्यामुळे ट्रेन बंद करा, बस बंद करा, पण रेल्वे आणि बस आपल्या शहराच्या जनजीवनाच्या मुख्य वाहिन्या आहेत. त्या बंद करणं सोपं आहे. पण त्या बंद केल्यानंतर जो आपला अत्यावश्यक सेवा पुरवणारा कर्मचारीवर्ग आहे त्याचं येण्याजाण्याचं काय करणार? आपल्या वाडय़ा वस्त्यांमधले जे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे असलेला कर्मचारीवर्ग, कम्पांऊंडर आहेत. त्याचप्रमाणे आपली जी मोठी रुग्णालये आहेत, त्यात काम करणारे डॉक्टर्स, सिस्टर्स, कर्मचारी आहेत, ऍम्बुलन्स चालवणारे आहेत. त्यांची ने-आण कशी होणार. त्याचबरोबरीने महापालिका कर्मचारी आहेत जे आपले आरोग्य नीट राखण्यासाठी शहराची साफसफाई करतात, पाणी सोडणारे कर्मचारी ये-जा करीत असतात. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतोय की, तूर्त या दोन सेवा बंद न करता. इतर सर्व सेवा बंद करीत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अस्थापनांमधील कर्मचाऱयांचे वेतन बंद करू नका

बंद होणाऱया अस्थापने, संस्थांना तसेच मालकांना विनंती करीत आहे की एकमेकांशी संपर्क टाळायचा असला तरी आपलं एकमेकांशी नातं घट्ट ठेवून संकटावर मात करायची आहे. आपला जो कर्मचारी वर्ग ज्यांचं तळहातावर पोट आहे. त्यांचं किमानवेतन बंद करू नका. संकट येतं आणि जातं पण या संकटात टिकते आणि टिकवते ती माणुसकी. तेव्हा माणुसकी सोडू नका. शुक्रवारी जगण्यासाठी एक पाऊल टाकत आहोत. माणुसकीच्या आधारावरच हे युद्ध जिंकणार आहोत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

घरात बसून, लढाईवर विजय मिळवायचा आहे

महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, आपल्यावरील संकट ओळखणारी आहे, एकमेकांना सहकार्य करणारी आहे. महाराष्ट्र लढणारा आहे. अनेकदा रणांगणात उतरून लढायचं असतं, ती लढाई आपले डॉक्टर्स आणि इतर स्टाफ लढतोय. आपण मात्र घरात बसून या लढाईवर विजय मिळवायचा आहे. सरकार म्हणून सर्व यंत्रणा सज्ज आहे. सरकार लढतं आहे, आपलं सहकार्य महत्त्वाचं आहे. या सहकार्याच्या जोरावर आपण ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आर्थिक संकटावरील उपायांसाठी अभ्यासगट

या शहरांमधल्या लोकांत जो काही संभ्रम असेल तर ते तिथले, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलू शकतात. आर्थिक व्यवहार महत्त्वाचा भाग आहे. हे संकट उभं ठाकलं असताना यापुढचं संकट हे आर्थिक संकट आहे. त्याहीसाठी उपाय शोधतो आहोत. त्यासाठी अभ्यासगट नेमला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ही फिरण्याची सुट्टी नाही, हितासाठी टाकलेले बंधन

आज ज्या कारणामुळे गर्दी होते, ट्रेन बसेस वापरल्या जातात ते कारण बंद करीत आहोत. मला खात्री आहे की हे झाल्यानंतर गर्दी पूर्णपणे बंद होईल. पण जर का तरीदेखील आम्हाला असं वाटलं की एवढं सांगूनही तरी ट्रेन, बसमध्ये गर्दी ओसरतेय पण थांबत नाही तर नाईलाजाने आम्हाला शेवटचं पाऊल टाकण्याची वेळ येईल. ही फिरण्याची सुट्टी नाही. हे आपल्या हितासाठी टाकलेले बंधन आहे, अशी समजच उद्धव ठाकरे यांनी दिली.

नैतिकतेचे भान ठेवून मदतीसाठी पुढे आलेल्या कलाकारांचे आभार

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या जनजागृतीसाठी कलाकारांनी, क्रीडा पटूंनी बनविलेल्या फिल्मबद्दल त्यांचे आभार मानले. उद्धव ठाकरे म्हणाले, चित्रपट निर्माते रोहित शेट्टी चारपाच दिवसांपूर्वी भेटले त्यांनी समाजासाठी काहीतरी करायचं आहे असं सांगितलं. नुसतं बोलून थांबले नाहीत तर त्यांनी एक अप्रतिम फिल्म बनवून महाराष्ट्र सरकारकडे दिली आहे. ती सीएमओमधून रिलिज केली आहे. याबद्दल रोहित शेट्टी, अमिताभ बच्चन, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, आलिया भट्ट, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन, आयुष्यमान खुराना, अजय देवगण हे सर्व पुढे आले आहेत. यांच्याबरोबरच विराट, सचिन यासारखे क्रीडापटूही पुढे आले आहेत, या सर्वांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानाले.

मुंबई सोडून गावी जाणाऱयांची संख्या झपाटय़ाने वाढल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सर्वच प्रमुख स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर गर्दी झाली आहे.

आयकर परतावा मुदत वाढवून द्यावी

आर्थिक वर्ष 2019-19 चे सुधारित क उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय 234 बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच 30 एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून देण्याची विनंती करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2020 ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 22 मार्च आहे, तीदेखील वाढवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

15 दिवस काळजी घ्या!

गुरुवारी केलेल्या आवाहनानंतर प्रतिसाद मिळतोय. आपलं जे एक विश्वासाचं नातं आहे त्या नात्याच्या शक्तीनेच या संकटावर मात करू शकतो. गर्दीमध्ये लक्षणिक फरक पडला आहे. तरीही पुढचे 15 दिवस अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. आता तरी संपर्क टाळणे, संसर्ग टाळणे याखेरीज कोणतंही शस्त्र या लढाईसाठी आपल्या हाती नाही. म्हणून अत्यंत नाईलाजाने महाराष्ट्र सरकार काही गोष्टी आपल्याला रुचणाऱया नसतील, पटणाऱया नसतील पण त्या काळजीपोटी करीत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पाच रुग्ण बरे होऊन घरी परतले

कोरोनाबाधित रुग्णांपैकी पाच रुग्णांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली असून त्यात मुंबईतील तीन जणांचा समावेश असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील काही कोरोनाबाधित रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असून अशा रुग्णांचा 14 दिवसांचा किलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

  • मुंबईची लोकल आणि बेस्ट बसेस सुरूच राहणार
  • कर्मचाऱयांचे किमान वेतन कापू नका
  • सुट्टी फिरण्यासाठी नाही; घरी बसा

कुठे बंद?

  • मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, उरण, अलीबाग, पेण, माथेरान, कर्जत, खोपोली, पालघर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर

काय सुरू

  • रेल्वे, बस, बँक, दूध-भाजीपाला-किराणा-औषध दुकाने

काय काय बंद?

शाळा, महाविद्यालये, नाटय़गृह-सिनेमागृह, मॉल्स, जलतरण तलाव, व्यायामशाळा, सर्व सभा-समारंभ, खासगी कार्यालये, जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व दुकाने, पानटपऱया, ऑर्केस्ट्रा-डान्सबार, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे.

आपली प्रतिक्रिया द्या