कोरोनाग्रस्त चीनमधून हिंदुस्थानी नागरिकांना परत आणण्यासाठी ग्लोबमास्टर विमान पाठवणार

433

कोरोना व्हायरसने चीनमध्ये हाहाकार उडवला आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुस्थानी नागरिकही अडकले आहेत. या हिंदुस्थानी नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. हिंदुस्थान आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी चीनमध्ये हवाई दलाचं सी 17 ग्लोबमास्टर हे जंबो विमान पाठवणार आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. करोनाचा सर्वाधिक फटका चीनमधील वूहान प्रांताला बसला आहे. कोरोनाग्रस्त मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर चीनच्या वूहानमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींना वाचवण्यासाठी हिंदुस्थानी सरकारने मोठी धडक मोहीम हाती घेतली आहे. ‘सी 17 ग्लोबमास्टर’ हे हवाई दलाचं अवजड वाहतूक करणारं विमान चीनमध्ये अडकून पडलेल्या हिंदुस्थानींची सुटका करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. हे विमान 20 फेब्रुवारीला दिल्लीहून रवाना होईल. चीनमध्ये त्याच दिवशी ते पोहोचेल. चीनमधून सर्व हिंदुस्थानींना सुखरूप मायदेशी परत आणणे आणि त्यांच्यावर आवश्यकता भासल्यास उपचार करण्याचीही तयारी केंद्राने ठेवली आहे.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1900 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील हजारो डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी प्राण संकटात घालून रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोनाच्या 11 हजारांहून अधिक रुग्णांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.या पार्श्वभूमीवर चीनमधील हिंदुस्थानींना सुखरूप मायदेशी आणण्याची कारवाई हिंदुस्थानी हवाई दल करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या