पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही

कोरोनावर रामबाण उपाय असल्याचा दावा करत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेने कोरोनील नावाचे औषध तयार केले आहे. या औषधाची लवकरच विक्री सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. महाराष्ट्रामध्ये या औषधाच्या विक्रीला तूर्तास परवानगी नाकारण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

या औषधाच्या प्रयोगशाळेतील चाचणीबाबत पूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाहीये. हे लक्षात घेता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की ‘नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस, जयपूर हे कोरोनील औषधाच्या प्रयोगशाळेत तपासण्या झाल्या आहेत अथवा नाही हे पाहतील. आम्ही हे सूचित करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आम्ही बनावट औषधांच्या विक्रीस परवानगी देणार नाही’

‘कोरोनील’ लाँच केल्यानंतर अवघ्या काही तासांतच केंद्र सरकारने या औषधाच्या बाटलीला बुच लावले होते. ‘कोरोनील’च्या जाहिराती तत्काळ थांबविण्याचे आदेश सरकारने पतंजलीला दिले आहेत. ‘कोरोनील’ची रुग्णांवर चाचणी करण्यासाठी सीटीआयआरकडून परवानगी घेवून सरकारी यंत्रणेची रितसर मान्यता घेतल्याचे रामदेवबाबा यांनी सांगितले. मात्र, केंद्रीय आयुष मंत्रालयाने आदेश काढून ‘कोरोनील’बाबत केलेल्या दाव्यांची वैद्यकीय पडताळणी करावी लागेल असे म्हटले आहे.

आयुष मंत्रालयाच्या या आदेशानंतर राजस्थानमध्ये या औषधाच्या विक्रीस सर्वप्रथम बंदी घालण्यात आली. राजस्थान सरकारने स्पष्ट शब्दात सांगितले की जोपर्यंत आयुष मंत्रालय परवानगी देत नाही तोपर्यंत तोपर्यंत कोरोनावरील औषध म्हणून कोणत्याही आयुर्वेदीक औषधाच्या विक्रीस आम्ही परवानगी देणार नाही. कोरोना बरा करणारे औषध असं सांगून जर कोणी औषधांची विक्री करत असेल  तर त्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल असाही इशारा तिथल्या सरकारने दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या