मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या 450 कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी कोविड भत्ता! महापौरांनी दिले निर्देश

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कंत्राटी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांचा मार्च 2020 पासून प्रलंबित असलेला कोविड भत्ता दिवाळीपूर्वी देण्यात यावा, असे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्याचा लाभ संस्थेत काम करणाऱ्या 450 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान व कोविड भत्त्याबाबत महापालिका अधिकारी व युनियनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक महापौर निवासात झाली. यावेळी महापौर म्हणाल्या, संस्थेत 1999 पासून संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

महापालिका कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे कोविड भत्ता देण्यात आला त्याप्रमाणेच या कर्मचाऱ्यांनासुद्धा भत्ता देण्यात यावा. दिवाळीपूर्वी या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोना भत्ता मिळण्याची कारवाई तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दरम्यान, मुंबईतील क्षयरोग विभागात काम करणारे सुमारे 450 कंत्राटी कर्मचारी गेले सहा महिने प्रवास, आहार, जोखीम अशा अनेक भत्त्यांसह कोरोना भत्ता तातडीने दिले जावेत, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिकेकडे केली होती. या बैठकीला उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, अधिकारी तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘बजेट हेड’ची नियुक्ती करणार
सानुग्रह अनुदान देण्याबाबत महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा केली असून या वर्षी या कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत ‘बजेट हेड’ची नियुक्ती करण्याबाबतचे पत्र द्यावे. त्यामुळे पुढच्या वर्षी या कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान मिळणे सोयीचे होऊ शकेल, असे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱयांना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या