>>अस्मिता येंडे
नोकरी व व्यवसाय करू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी लेखिका मेघना धर्मेश यांचे `कॉर्पोरेट मंत्रा’ हे पुस्तक उत्तम दिशादर्शक आहे. कॉर्पोरेट क्षेत्राविषयी अनभिज्ञ असणाऱ्या नोकरदार वर्ग, व्यावसायिक, उद्योजक यांसाठी हे माहितीपर पुस्तक उपयोगी आहे. या लेखसंग्रहात एकूण 41 लेखांचा समावेश असून प्रत्येक लेख सहज आकलन होईल अशा भाषाशैलीत लेखिकेने शब्दबद्ध केला आहे. उगीचच अवजड शब्दांचा वापर न करता रोजच्या वापरातील शब्दप्रयोग आणि मनमोकळी निवेदन शैली यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राविषयी वाटणारे दडपण आपोआप कमी होते. लेखांचे वैशिष्टय़ म्हणजे मुद्देसूद आणि अचूक लेखनशैली. लेखिका स्वत मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ असून त्यांना या क्षेत्राविषयी सखोल ज्ञान आहे. आपल्याला ज्ञात असलेली माहिती इतरांपर्यंत पोहोचावी या हेतूने त्यांनी लेखन केलेले आहे.
या लेखसंग्रहाची सुरुवात अगदी पायाभूत गोष्टीपासून झाली आहे, ते म्हणजे `प्रभावी बायोडेटा’. बऱ्याचदा या प्राथमिक गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही, पण खरे तर तिथूनच आपली प्रतिमा तयार होण्यास सुरुवात होते. आपला प्रभावी बायोडेटा तयार करण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत, कशा प्रकारे आपला बायोडेटा प्रभावी पद्धतीने तयार करू शकतो तसेच कोणत्या चुका टाळाव्यात याचे मुद्दे अगदी नेमकेपणाने यात सांगितलेले आहेत. नोकरी व व्यवसाय यातील काय निवडावे व त्यासाठी कोणत्या घटकांचा प्रामुख्याने विचार करायला हवा, हे `नोकरी की व्यवसाय?’ या लेखातून उद्धृत केले आहे.
स्वतंत्रपणे कर्मचारी म्हणून काम करताना किंवा संघनायक म्हणून काम करताना आपल्या संघातील कर्मचाऱ्यांशी सामंजस्याने कसे वागावे, सांघिक संबंध अधिक चांगले कसे होतील, यावर लेखिकेने उत्तम भाष्य केले आहे. `नाही’ म्हणणे हीसुद्धा एक कला आहे. एखाद्या गोष्टीसाठी नकार देताना तो कशा पद्धतीने दिला जातो, यावर सगळे अवलंबून आहे. कामाबाबतीत एखादी गोष्ट आवाक्याबाहेरची आहे, अवास्तव आहे, आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे, अशा वेळी `नाही’ म्हणायला शिकले पाहिजे. मनातील न्यूनगंड, नकारात्मकता, असूया, द्वेष, अहंकार या षड्रिपूंवर मात करून मनात आत्मविश्वास निर्माण करणे, आपल्या क्षमता ओळखणे, खंबीर वृत्तीने जगणे, कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची तयारी ठेवणे, या मानसिक व्यवस्थापनाचीही गरज निर्माण झाली आहे. काम करताना आपली जनसंपर्क संख्या वाढवणे, निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ, प्रभावी संभाषण कौशल्य, उद्योजक क्षेत्रात ग्राहक हा केंद्रबिंदू असतो, त्याला कसे जपावे, अर्थात उद्योग- व्यवसाय करू पाहणाऱ्यांसाठीसुद्धा हे घटक अभ्यासणे गरजेचे आहे. याची माहिती देण्यात आलेली आहे.
परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही, पण येणाऱ्या परिस्थितीनुरूप स्वतत बदल करणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांच्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्र नवीन आहे, त्यात प्रवेश करायचा आहे, चांगले करीअर घडवायचे आहे आणि या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर काही महत्त्वपूर्ण बाबी जाणून घेणे गरजेचे आहे. तुमचा विकास साधण्यासाठी आणि जीवन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी `कॉर्पोरेट मंत्रा’ हे पुस्तक परिपूर्ण मार्गदर्शक आहे.
कॉर्पोरेट मंत्रा
लेखिका : मेघना धर्मेश
प्रकाशक : शब्द शिवार प्रकाशन
मूल्य : 125 रुपये