राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद अपात्र

25

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांचे नगरसेवकपद आज जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले. पवार यांनी निवडणूक अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात आपल्यावरील गुन्हे, अनुदानित संस्थेकडून मिळणारे वेतन लपविले होते. याविरोधात काँग्रेसचे पराभूत माजी नगरसेवक संजय छल्लारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. पवार हे रयत शिक्षण संस्थेत शिक्षकेतर कर्मचारी आहेत. पालिकेतील आदिक गटास हा मोठा धक्का मानला जात आहे.

प्रभाग १२ मधील राजेंद्र पवार व संजय छल्लारे यांच्यात लढत झाली होती. यात पवार सुमारे ७५० मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांच्या या निवडीला छल्लारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आव्हान दिले होते. पवार यांच्या विरोधात न्यायालयात दोन खटले प्रलंबित आहेत. उमेदवारी अर्ज भरताना संबंधित रकाण्यात निरंक ठेवण्यात आले. शिवाय रयतच्या कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात पवार शिक्षकेतर कर्मचारी म्हणून नोकरी करीत आहेत. हे विद्यालयत पूर्णपणे शासकीय अनुदानावर चालते.

पवार यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नोकरीचा किंवा वेतनाचा उल्लेख न करता निरंक लिहिले होते. छल्लारे यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी होऊन व त्यांनी सादर केलेले पुरावे जिल्हाधिकारी यांनी ग्राह्य धरले. दोन्ही बाजुंचे म्हणने ऐकल्यानंतर त्यांनी पवार यांचे नगरसेवकपद रद्द ठरविले. छल्लारे यांच्यावतीने विधिज्ञ शैलेश गंगाडेकर, सादिक शिलेदार यांनी काम पाहिले.

निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या मानसिकतेतून माझ्या विरूद्ध तक्रार करण्यात आली होती. माझ्या पदावर घेतलेला आक्षेप हा मला निवडून दिलेल्या मतदारांवर घेतलेला आक्षेप आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. – राजेंद्र पवार, नगरसेवक

पवार यांनी सर्वांची फसवणूक केली. मात्र ते कायद्याची फसवणूक करू शकत नाही. कायद्यासमोर सर्वच सारखेच असतात. हे या निकालावरून सिद्ध झाले. – संजय छल्लारे, माजी नगरसेवक

आपली प्रतिक्रिया द्या