साईबाबाला शिक्षा, बुरखा फाडणारा निकाल

58

<<ब्रिगेडियर हेमंत महाजन >>

साईबाबाला झालेली शिक्षा म्हणजे उच्चभ्रू वर्तुळात राहून पडद्याआड काम करणाऱ्या माओ समर्थकांचा बुरखा फाडणारा निकाल आहे. तोडफोड, हिंसाचार करणारे माओवादी आणि त्यांचे समर्थक सहसा हाताला लागत नाहीत. लहानसहान प्यादी पकडली जातात, पण ‘विचारवंत’ नामानिराळे राहतात. येथे प्रथमच मोठा मासा गळाला लागला. शिक्षणासारख्या पेशात राहून तरुणांची माथी भडकवणाऱया साईबाबा आणि त्याच्यासारख्यांना कोर्टाने उघडे पाडले आहे.

माओवाद्यांच्या कारवायांनी कायम चर्चेत राहणाऱ्या विदर्भातील गडचिरोली जिह्याने या आठवड्यात वेगळी बातमी दिली. माओवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचा निलंबित प्राध्यापक गोपालकोंडा नागा साईबाबा याच्यासह पाच जणांना गडचिरोलीच्या जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. साईबाबासारख्या माओवादी समर्थकाला शिक्षा होण्याची ही दुसरी वेळ आहे.

अर्थात साईबाबाला झालेली शिक्षा म्हणजे उच्चभ्रू वर्तुळात राहून पडद्याआड काम करणाऱ्या माओ समर्थकांचा बुरखा फाडणारा निकाल आहे. असे अनेक साईबाबा पडद्याआड कटकारस्थाने करीत आहेत. तोडफोड, हिंसाचार करणारे माओवादी आणि त्यांचे समर्थक सहसा हाताला लागत नाहीत. लहानसहान प्यादी पकडली जातात, पण ‘विचारवंत’ नामानिराळे राहतात. येथे प्रथमच मोठा मासा गळाला लागला. शिक्षणासारख्या पेशात राहून देशविघातक कारवायांसाठी तरुणांची माथी भडकवणाऱ्या साईबाबा आणि त्याच्यासारख्यांना कोर्टाने उघडे पाडले आहे.

इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर आधारित हा ऐतिहासिक निकाल आहे. गडचिरोलीतल्या पोलीस अधिकाऱ्याची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. साईबाबा एकटा नाही. त्याचे समर्थक देशभर आणि जगभर पसरले आहेत. मे २०१४ मध्ये अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास बावचे यांनी साईबाबाला दिल्लीला जाऊन अटक करून गडचिरोलीला आणले तेव्हा तब्बल ९० देशांमधून त्यांना धमकीची २० हजार पत्रे आली होती. यावरून या साईबाबाची ताकद कळते. ४७ देश फिरून आलेला अपंग साईबाबा आज ५१ वर्षांचा आहे. तो मूळचा आंध्र प्रदेशातला. विद्यार्थीदशेतच चळवळीत ओढला गेला. पुढे तो दिल्लीतल्या रामलाल आनंद महाविद्यालयात रुजू झाला. दोन्ही पायांनी अपंग असल्याने कुणाला संशय यायचा प्रश्न नव्हता. कॉलेजात शिकवणे सुरू असतानाच साईबाबा माओवाद्यांकरिता काम करू लागला. पुढे त्याच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. भूमिगत राहून काम करणारे माओवादी नेते आणि माओवादी संघटना यांच्यातील संपर्काचा तो प्रमुख सूत्रधार होता. वेगवेगळ्या नावाने तो काम करायचा. हेम मिश्राला त्याने गडचिरोलीच्या जंगलात जाऊन दलम कमांडर नर्मदाक्का हिला एक संदेश पोहोचवायचे काम दिले. या कामावर असताना गडचिरोली पोलिसांनी मिश्रासह तिघांना अटक केली. त्याच्याकडे सापडलेल्या पेन ड्राईव्हमधील डेटा फाईल करण्यासाठी वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर साईबाबाच्या नावाने आहे. त्यामुळे पोलीस दिल्लीत साईबाबापर्यंत पोहोचले. तपासात खूप माहिती बाहेर आली. साईबाबाच्या घरून जप्त करण्यात आलेल्या पाच हार्ड डिस्क, तीन टेराबाइट डाटा महत्त्वाचा पुरावा ठरला.

साईबाबा माओवाद्यांकरिता महत्त्वाचा समर्थक होता. विविध गटांत विखुरलेले माओवादी २००४ मध्ये एकत्र आले होते. त्या काळात जगात माओ विचारसरणीला मानणाऱया संघटनांना एकत्र आणण्यासाठी साईबाबाने पुढाकार घेतला. आंतरराष्ट्रीय विभागाची स्थापना केली. फिलिपाइन्समधील कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने इंटरनॅशनल लीग फॉर पीपल्स स्ट्रगल नावाच्या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. ४२ देश सदस्य असलेल्या या संघटनेचा साईबाबा हा डेप्युटी सेक्रेटरी आहे. नेपाळच्या माओवाद्यांनीही वेळोवेळी हिंदुस्थानातील माओवाद्यांना मदत केली आहे. माओवाद्यांचा हिंदुस्थानातील ज्ये… नेता गणपती याने वेळोवेळी दिल्लीत जाऊन साईबाबाची भेट घेतल्याची माहिती आहे.

दिल्ली विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरू असलेल्या कथित ‘आझादी’ आंदोलनांनाही निकालाने झटका बसणार आहे. `आझादीचे नारे देणाऱया कन्हैयाकुमार, उमर खालीद, अभिनंदन भट्टाचार्य यांसारख्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे. हे सारे माझे विद्यार्थी आहेत’, असे साईबाबाने सप्टेंबर २०१६ मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते. विद्यापीठे देशद्रोही राजकारणाचे अड्डे बनत चालली आहेत. शिक्षणासारख्या पवित्र व्यासपीठाचा वापर करून फुटीरतेची बीजे रोवण्याचे काम सुरू आहे.

साईबाबा आणि त्याच्या साथीदारांना झालेल्या शिक्षेचे पडसाद आता छत्तीसगढ, मुंबई आणि गडचिरोली येथेही उमटत आहेत. मुंबईत बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) रद्द करण्याच्या मागणीसाठी माओवादी समर्थक एकत्रित आलेत. देशपातळीवर साईबाबा याच्या शिक्षेचा विरोध व्यक्त करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. त्यामुळेच साईबाबा याला शिक्षा ठोठावल्यानंतर गडचिरोली किंवा परिसरात काहीना काही कारवाया होणार असल्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार ११ मार्च रोजी छत्तीसगढमधील सुकमा येथे सीआरपीएफच्या तुकडीवर माओवाद्यांनी हल्ला केला. त्यात सीआरपीएफचे १२ जवान शहीद झाले.

साईबाबा याच्या समर्थनार्थ देशभरातील माओवादी समर्थक संघटना पुढे सरसावल्या आहेत. त्यात माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या काही आजी व माजी माओवाद्यांचाही समावेश आहे. त्यांनी १२ मार्चला मुंबईत यूएपीए कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सेमिनार घेतला. मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झालेल्या सेमिनारमध्ये गडचिरोली न्यायालयाने साईबाबा याच्यासह पाच जणांना सुनावलेल्या शिक्षेला तीव्र विरोध करण्यात आला. यूएपीए कायदा हा मानवाधिकारांचे हनन करणारा असून तो कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने दिलेल्या निकालाचाही निषेध करण्यात आला.

अनेक राष्ट्रद्रोही विचारवंत माओवाद्यांना समर्थन करणारी वक्तव्ये, भाषणे, चर्चासत्रे करतात; पण अशा भाषणांना किंवा लेखांना विनाकारण प्रसिध्दी देण्याचे काम टीव्ही वाहिन्या, वर्तमानपत्रे का करतात? त्यांनी या वैचारिक आतंकवादाचे उदात्तीकरण करायला हवे का? अशी वर्तमानपत्रे व टीव्ही वाहिन्यांची काही कर्तव्ये आहेत की नाही? राष्ट्राचे हित लक्षात ठेवून जर व्यापक चिंतन घडवले, तर प्रसारमाध्यमांचे योगदान महत्त्वाचे ठरू शकते. माओवाद्यांचा बुरखा फाडण्याचे काम प्रसारमाध्यमांनी केले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या