सरपंच व ग्रामसेवकाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशीची मागणी

सामना प्रतिनिधी । औसा

औसा तालुक्यातील टाका येथील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी १४ व्या वित्त आयोगातील विकास कामाच्या निधीचा संगनमत करुन भ्रष्टाचार केला असून सदर भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी अशी मागणी गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्याकडे निवेदनाद्वारे टाका ग्रामस्थांनी केली आहे.

टाका ग्रामपंचायतीस १४ व्या आयोगातून प्राप्त विकासाच्या निधीतून कागदोपत्री एलईडी व ई-लर्निंगची कामे दाखविली असून हे काम बोगस दाखविण्यात आले आहे. एलईडी लाईटची व ई-लर्निंगसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरुन वाजवी पेक्षा जास्ती खर्च दाखविला आहे. ग्रामस्थ सरपंच व ग्रामसेवक यांना अनेकवेळा विचारणा करीत असता ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दोघेही दुर्लक्ष करीत आहेत. एलईडी व ई-लर्निंग बसविण्यासाठी ग्रामसभा न घेता ग्रामस्थांची दिशाभूल करुन निकृष्ट दर्जाचे साहित्य बसवून १४ व्या वित्त आयोगाच्या विकास निधीचा गैरवापर केला आहे. या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी दि. १० सप्टेंबर २०१८ रोजी टाका ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करतील असा इशारा टाका येथील ग्रामस्थ कुलदीप पांडूरंग शिंदे व विनोद विजयानंद गोरे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.