‘जलयुक्त शिवार’मध्ये भ्रष्टाचार; 1300 कामांची चौकशी सुरू

सामना ऑनलाईन, मुंबई

सध्या राज्यातल्या 1300 ‘जलयुक्त शिवार’च्या कामांची विभागीय चौकशी सुरू आहे. या चौकशीचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी करावी, तसेच या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्यावर उत्तर देताना तानाजी सावंत म्हणाले, चौधरी या आरटीआय कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर जलसंधारण विभागाकडे या प्रकरणाची उघड चौकशी करण्याची परवानगी मागण्यात आली होती, मात्र कृषी आयुक्तालय स्तरावरून सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून या प्रकरणाची चौकशी सुरू केलेली आहे.

जिथे अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत अशी 1300 जलयुक्त शिवाराची कामे निवडली असून जिह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. उर्वरित कामांचा अहवाल एका आठवडय़ात प्राप्त होईल. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत चौकशी करायची की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सावंत यांनी सांगितले. त्यांच्या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हस्तक्षेप करीत हा प्रश्न राखून ठेवला.