कारशेड नावाला; `मेट्रो’ची `बनिया’गिरी उघड

मुंबई – आरे कॉलनीत ‘मुंबई मेट्रो-थ्री’च्या कार डेपोचा एकमेव प्रकल्प उभा राहणार आहे हा मुंबईकरांचा समज अखेर साफ चुकीचा निघाला आहे. कारण २३ हजार १३६ कोटींचा कार डेपो उभारणाऱया ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने डेपोबरोबरच त्याच जागेवर टोलेजंग निवासी टॉवर्स आणि व्यावसायिक संकुले उभी करण्यासाठी राज्य सरकारकडे ३ एफएसआयची मागणी केली आहे. ‘आरे’चा भूखंड बिल्डरांच्या घशात घालून मुंबईकरांच्या ऑक्सिजनवरच डाका टाकण्याचा मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा डावा अशा रीतीने उघड झाला आहे. कार डेपोसाठी तब्बल ८१ एकरांचा भूखंड आरक्षित करण्यात आलेला आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने वर्षभरापूर्वीच तीन एफएसआयसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असलेल्या नगर विकास खात्याशी पत्रव्यवहार केला आहे. सुमारे एक हजार कोटींचा निधी उभारण्यासाठी आरे कॉलनीतील जागेचा व्यावसायिक वापर करण्याचे मनसुबे ‘मुंबई मेट्रो’ने रचले आहेत. ही धक्कादायक माहिती झोरू भतेना या ‘आरटीआय’ कार्यकर्त्याला माहिती अधिकार कायद्याखाली प्राप्त झाली आहे. त्यातून ‘मुंबई मेट्रो’ आणि राज्य सरकार यांच्यातील पत्रव्यवहार बाहेर आल्याचे वृत्त एका इंठाजी वृत्तपत्राने दिले आहे.

राज्य सरकारने तत्परतेने हरकती-सूचना मागवल्या

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तीन एफएसआयची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्याच महिन्यात त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. आरे कॉलनीतील मुंबई मेट्रो कारशेडचा ८१ एकरांचा भूखंड चर्चगेट येथील ओव्हल मैदानाच्या चार पटींनी मोठा आहे. एवढा मोठा विस्तीर्ण भूखंड ‘नो डेव्हलपमेंट झोन’मधून वगळून मेट्रो कार डेपो शॉप आणि कमर्शियल (सी-१) झोनसाठी आरक्षित करण्याचा घाट नगरविकास खात्याने घातला आहे. आरे कॉलनीचा भूखंड ‘सी-१ झोन’ केल्याने त्यावर टोलेजंग निवासी टॉवर्स आणि व्यावसायिक संकुले उभारण्याचा मार्ग खुला होणार आहे.

१९४९ सालात आरे कॉलनीचा भूखंड ३ हजार २६२ एकरांचा होता. त्यात भूखंडाच्या क्षेत्रफळात १ हजार एकरांची घट झाली असून आता २ हजार ८७ एकर भूखंड उरला आहे.

८१ एकरांचा भूखंड मेट्रो-३ साठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यात आला आहे.

त्यातील ८.६ एकरांवरच ‘मुंबई मेट्रो’ आजघडीला तात्पुरते ‘कास्टिंग यार्ड’ उभारणार आहे.

मुळात मुंबई मेट्रोच्या कार डेपोसाठी ८१ एकर भूखंडाची गरज नाही. त्याहून कमी जागेत कारशेड सहज उभी राहू शकते; पण त्या कार शेडच्या नावाखाली व्यावसायिक वापरासाठी ‘नो डेव्हलपमेंट झोन’ मधील जागा लाटण्याचा मुंबई मेट्रोचा डाव आहे. – झोरू भतेना, माहिती अधिकार कार्यकर्ते

राज्य सरकारने ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ची तीन एफएसआयची अभूतपूर्व मागणी मंजूर केली तर बिल्डरांची चांदी होणार आहे. ८१ एकरांच्या त्या भूखंडावर १५ लाख चौरस फुटांचे बांधकाम करून २ हजार कोटी रुपये कमावतील. – बांधकाम व्यवसाय तज्ञ

आपली प्रतिक्रिया द्या