कामात शंभर टक्के भ्रष्टाचार झाला असणार! जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचे परखड मत

‘‘मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना मनाला अत्यंत वेदना देणारी आहे. या घटनेला भ्रष्टाचार, कमिशनखोरी आणि राजकीय सिस्टम जबाबदार आहे. शंभर टक्के यात भ्रष्टाचार झाला असणार,’’ असे परखड मत जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी व्यक्त केले. अनुभव नसणारे कारागीर आणि टेंडरबाजी प्रक्रियाही याला कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले.

सिंधुदुर्गात मालवणच्या समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेसंदर्भात दैनिक ‘सामना’शी बोलताना जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी आपले परखड मत मांडले. रामपुरे हे देशातील उत्कृष्ट शिल्पकार म्हणून ओळखले जातात. देशातील सर्वांत मोठा 108 फुटांचा शंकराचार्यांचा पुतळा त्यांनी उभारला आहे.

वाऱ्याच्या वेगाचा विचार आधीच का केला नाही?

‘‘ताशी 45 कि.मी. वेगाने वारे वाहत असल्यामुळे  पुतळा कोसळला, असा युक्तिवाद आता केला जात आहे. परंतु याचा विचार पूर्वीच का केला गेला नाही?’’ असा खडा सवाल रामपुरे यांनी केला. ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशवासीयांची मने दुखावली आहेत. एक कलावंत म्हणून माझ्यासाठी अत्यंत वेदना देणारी व शरमेची ही घटना आहे,’’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी

‘‘अलीकडे एक राजकीय ट्रेंड निघाला आहे. आपल्या वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी, निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आधी उद्घाटनाची तारीख ठरविणे आणि पुतळ्याच्या कामाला सुरुवात करणे, घाईत काम उरकायला लावणे, कमिशनखोरीसारख्या प्रवृत्ती या घटनेस जबाबदार आहेत,’’ असे त्यांनी सांगितले.

मित्राच्या मुलाला अनुभव नसताना काम दिले

‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी वास्तविक अनुभवी शिल्पकारांची निवड करणे गरजेचे होते; परंतु कोणाच्या तरी मित्राचा मुलगा असेल म्हणून अनुभव नसणाऱ्या एका 24 वर्षीय मुलाला हे काम देण्यात आले. टेंडरबाजी प्रक्रिया, कमी किमतीत काम करून घेण्याबरोबरच या घटनेला राजकीय सिस्टम जबाबदार आहे,’’ असे रामपुरे यांनी स्पष्टपणे सांगितले. ‘‘पुतळ्याचे काम सुरू असताना केंद्र सरकारची भूमिका काय होती? कला संचालनालयाने या कामासाठी परवानगी दिली होती का?’’ असे प्रश्न उपस्थित करून रामपुरे यांनी या घटनेला केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.