निवडणुकीच्या चर्चेस विरोध करणाऱ्या दाम्पत्याला मारहाण

639

विधानसभा निवडणुकीत कोण निवडून येणार, याबाबत चर्चा करणाऱ्या चारजणांना महिलेने आपल्या घराजवळ ही चर्चा करू नये, असे बजावल्याने चौघांनी महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपरीतील भीमनगर भाजी मंडईजवळ घडली. पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

याप्रकरणी शीतल सचिन सुर्वे (वय 30, रा. भीमनगर भाजी मंडईजवळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौतम विष्णू रोकडे (वय 45), प्रवीण भीमराव वडमारे (वय 40), सुनील विष्णू रोकडे (वय 38), संगीता प्रकाश गायकवाड (वय 45, सर्व रा. भीमनगर भाजी मंडईजवळ, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मतदान झाल्यानंतर आरोपी हे फिर्यादी शीतल यांच्या घराजवळ ‘पिंपरीतून कोण निवडून येणार’ याबाबत चर्चा करत होते. शीतल यांनी सर्वांना ‘घराजवळ चर्चा करू नका’ असे सांगितले. याचा राग मनात धरून चौघांनी शीतल यांना शिवीगाळ करत त्यांच्यासोबत झटापट केली. यामध्ये शीतल यांच्या हाताला दुखापत झाली. शीतल यांचे पती सचिन यांनी आरोपींना याबाबत जाब विचारला असता आरोपींनी सचिन यांनादेखील शिवीगाळ करत हाताने व कोयत्याने मारहाण केली. यामध्ये सचिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पिंपरी पोलिसांनी गौतमला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या