शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करून जास्त व्याजदराने पैसे मिळवून देतो, असे आमिष दाखवून लावलेल्या सापळ्यात अडकलेले संगमनेर येथील व्यापारी संकेत शिवाजी कोकणे यांना एका जोडप्याने लाखो रुपयांना फसवले. या जोडप्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशांक चंद्रशेखर वडके आणि प्रियंका शशांक वडके (रा. 276, भिवंडी, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी संकेत कोकणे (रा. कॉटन किंग, मेन रोड, संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
कोकणे यांना मित्राच्या माध्यमातून भेटलेल्या शशांक वडके याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याची पत्नी प्रियंका हिची एजन्सी असून, सहा टक्के दराने पैसे मिळतील, असे सांगितले. त्यानुसार कोकणे यांनी ग्लोब कम्युनिटीज कन्सल्टन्सी, ठाणे या नावावर मे 2019 मध्ये 30 लाख रुपये आरटीजीएसने जमा केले होते.
शशांक वडके यांनी कोकणे यांना ‘मी तुमचे अकाउंट काढतो आणि स्वतः चालवतो व तुम्हाला सहा टक्के दराने पैसे देतो,’ असे सांगितले होते. ‘मी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे नोकरी करत आहे,’ असेही कोकणे यांना सांगून ग्लोब कॅपिटल मार्केटिंग लिमिटेड या कंपनीची त्याची पत्नी प्रियंका हिच्याकडे एजन्सी असल्याचे कोकणे यांना भासविले होते. त्यानंतर साधारण पाच ते सहा महिने प्रत्येक महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये एवढी रक्कम कोकणे यांना तो देत होता. मात्र, एवढी मोठी रक्कम देऊन एवढे कमी पैसे कसे येतात, याचा संशय कोकणे यांना आला व त्यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी कोकणे यांनी मला पैसे गुंतवायचे नाहीत माझे संपूर्ण पैसे परत द्या, अशी मागणी केली. त्यावेळी वडके याने टाळाटाळ केली. त्यामुळे कोकणे यांना अधिकच संशय आला. अधिक माहिती घेतली असता, कोकणे यांच्या नावावर कोणतेही खाते नसल्याचे आणि ग्लोब कॅपिटल मार्केटिंग कंपनीत कुठलेही रजिस्ट्रेशन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या कंपनीकडे पैशाची मागणी केली असता कोकणे यांना फक्त 3 लाख 54 हजार 828 रुपये परत देण्यात आले. त्यामुळे उरलेल्या 26 लाख 45 हजार 172 रुपयांची शशांक वडके आणि त्याची पत्नी प्रियंका वडके या दोघांनी फसवणूक केल्याची फिर्याद कोकणे याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.