दत्तक घेतलेल्या 10 वर्षांच्या मुलीवर दांपत्याचा डीजिटल बलात्कार

दत्तक घेतलेल्या 10 वर्षांच्या मुलीवर दांपत्याने डीजिटल बलात्कार करून तिला बेदम मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे घडली आहे. लखनौ येथील एका अनाथाश्रमातून या मुलीला दत्तक घेण्यात आलं होतं. गंभीर जखमी झालेल्या या मुलीला जेव्हा तिच्या दत्तक मातेने रुग्णालयात नेलं, तेव्हा या भीषण प्रकाराचा खुलासा झाला.

ही घटना धूमनंगज येथील प्रीतम नगर येथे घडली आहे. येथे राहणाऱ्या सीमा (नाव बदलेललं) या महिलेने एका वर्षापूर्वी लखनौच्या अनाथाश्रमातून एका मुलीला दत्तक घेतलं होतं. शनिवारी सीमा तिच्या मुलीला जखमी अवस्थेत येथील रुग्णालयात घेऊन आली. तिच्या मुलीची तब्येत बरी नसून पडल्यामुळे तिच्या हाताला मार लागल्याचं तिने डॉक्टरांना सांगितलं. रुग्णालयातील तज्ज्ञांनी मुलीला तपासल्यानंतर तिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचं समजलं. मुलीच्या छातीवर आणि पाठीवरही जखमा होत्या आणि गुप्तांगातही दुखापत झाल्याचं दिसून येत होतं.

तिच्या तपासणीदरम्यान सीमाने पळून जायचा प्रयत्न केला. पण, रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तिला पकडून ठेवलं आणि पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी सीमाची कसून चौकशी केल्यानंतर तिने सत्य सांगितलं. तिने आणि तिच्या नवऱ्याने एका वर्षापूर्वी एका मुलीला लखनौ येथील अनाथाश्रमातून दत्तक घेतलं होतं. पण, तिच्याकडून ते घरातील कामं करून घेऊ लागले. त्यानंतर तिला मारहाण होऊ लागली. तिला इस्त्री आणि उलथण्याने चटके दिले गेले. दाताने चावा घेऊन तिला बेदम मारू लागले. तिच्यावर डीजिटल बलात्कारही करण्यात आला. पोलिसांनी सीमा आणि तिच्या नवऱ्याला अटक केली असून त्यांच्याविरुद्ध डीजिटल बलात्कार, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.