‘लव्ह जिहाद’वालं ‘ते’ पेज हटवलं, पण आता धमक्या सुरू

सामना ऑनलाईन । कोलकाता

काही दिवसांपूर्वी लव्ह जिहाद रोखण्यासाठी एका फेसबुक पेजवर शंभर जोडप्यांची यादी देण्यात आली होती. त्या यादीतल्या एका जोडप्याला आता जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. या जोडप्याने यासंबंधीची तक्रार कोलकाता पोलिसांना केली आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी हिंदुत्व वार्ता नामक एका फेसबुक पेजवर आंतरधर्मीय विवाह केलेल्या १०० जोडप्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या जोडप्यांना शोधण्यासाठी त्यांच्या फेसबुक प्रोफाईल लिंक्सही देण्यात आल्या होत्या. या जोडप्यांना शोधा, त्यातल्या हिंदू महिलांना वाचवा आणि लव्ह जिहाद रोखा असं आवाहन या पेजद्वारे करण्यात आलं होतं. त्यावर अनेक फेसबुक युजर्सनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर फेसबुकने ते पेज हटवलं होतं. मात्र, पेजवर जाहीर झालेल्या यादीतल्या एका जोडप्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

या जोडप्यातील तरुणाने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, माझ्या प्रेयसीने ४ जानेवारी रोजी हे फेसबुक पेज पाहिलं होतं. तिने मला या पेजबद्दल कल्पना दिली होती. काही दिवसांनंतर तिच्या सोशल मीडियावर तिला माझ्याशी संबंध तोडून टाकण्याविषयीचे मेसेज येऊ लागले. तिने काही जणांना ब्लॉकही केलं मात्र तरीही सतत वेगवेगळ्या अकाउंट्सवरून हे मेसेज येतच होते. त्यानंतर आम्हाला दोघांनाही जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. आमच्या जिवाला धोका उत्पन्न झाल्यामुळे आम्ही पोलिसांत तक्रार केली आहे. कोणीतरी हे मुद्दाम करत आहे. कारण, ही नावं संपूर्ण देशातील १०० जोडप्यांची असून कुणीतरी बारकाईने मागोवा घेत ती यादी तयार केली होती, असं या तरुणाचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या