बायकोने द्यावा देखभालीचा खर्च, नवऱ्याने केली मागणी

देशभरातील कौटुंबिक न्यायालयात पत्नीला पोटगी मिळण्याबाबतचे अनेक खटले आपल्याला सापडतील. मात्र उत्तर प्रदेशमधील मुझ्झफरनगरच्या कौटुंबिक न्यायालयात एक उलटाच प्रकार समोर आला आहे.

एका नवऱ्यानेच पत्नीकडून देखभालीचा खर्च मिळण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने देखील त्याची मागणी मान्य करत पत्नीला देखभालीचा खर्च देण्याचे आदेश दिले आहेत.

पत्नी लष्करातून निवृत्त

मुजफ्फरनगरमधील खतौली तालुक्यातील एहसाना गावातील ही घटना आहे. किशोरी लाल असे त्या पतीचे नाव असून त्याचे 30 वर्षांपूर्वी मुन्नी देवी सोबत लग्न झाले होते. मुन्नी देवी या लष्करातून निवृत्त झालेल्या आहेत त्यांना दर महिना दहा हजार निवृत्ती वेतन मिळते तर किशोरी लाल हा चहा विकतो.

घटस्फोट अर्ज केलेला नाही

गेल्या काही वर्षांपासून हे दोघेही वेगळे राहत आहेत. मात्र त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केलेला नाही. दरम्यान दहा वर्षांपूर्वी किशोरी लालने न्यायालयात पत्नीक़डून देखभाल खर्च मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. ‘माझी पत्नी चांगली कमवते. माझं उत्पन्न अगदी तुटपूंज असून त्यात माझे भागत नाही. त्यामुळे पत्नीने मला मदत करावी अशी मागणी किशोरी लालयाने न्यायालयाकडे केली होती.

किशोरी लालच्या मागणीवर तब्बल दहा वर्षांनी निर्णय आला असून न्यायालयाने मुन्नी देवी यांना दर महिना दोन हजार रुपये त्यांच्या पतीला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तरीही किशोरीलाल नाखूश

किशोरीलाल याच्या बाजूने निर्णय आला तरी तो नाखूश आहे. त्याला त्याच्या पत्नीच्या कमाईतील एक तृतीयांश हिस्सा हवा असल्याचे त्याने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या