महिलेला ‘छम्मक छल्लो’ म्हणणाऱ्याला तुरूंगवासाची शिक्षा

36
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन , ठाणे

एका महिलेला छम्मकछल्लो म्हणणाऱ्या व्यक्तीला ठाण्यातील दंडाधिकाऱ्यांनी तुरुंगवासाची आणि एक रूपया दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील तक्रारदार महिला आणि आरोपी हे एका इमारतीमध्ये राहातात. ९ जानेवारी २००९ मध्ये तक्रारदार महिला तिच्या नवऱ्यासोबत मॉर्निंग वॉकवरून परत आली. हे दोघेजण आपल्या फ्लॅटमध्ये जात असताना महिलेचा पाय चुकून आरोपीच्या घराबाहेर असलेल्या कचऱ्याच्या डब्याला लागला आणि डब्यातील कचरा बाहेर पडला. महिलेने आपल्या कचऱ्याच्या डब्याला मुद्दाम लाथ मारली असा समज झाल्याने आरोपी भडकला आणि त्याने या महिलेला उद्देशून छम्मकछल्लो असं म्हणत वाद घातला.

तक्रारदार महिलेने आधी हे प्रकरण सोसायटीकडे नेलं मात्र तिथे समाधान न झाल्याने तिने तक्रार नोंदवली. दंडाधिकाऱ्यांपुढे खटला उभा राहीला आणि या खटल्यामध्ये विस्ताराने युक्तीवाद करण्यात आले. आरोपीने आपल्यावर हेतुपुरस्सर आरोप लावल्याचा युक्तिवाद केला. मात्र त्याचा युक्तिवाद दंडाधिकाऱ्यांनी ग्राह्य धरला नाही. आदेशामध्ये दंडाधिकाऱ्यांनी म्हटलं की, छम्मकछल्लो या शब्दाचा अर्थ हिंदुस्थानी समाजामध्ये लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. हा शब्द महिलांचा अपमान करण्यासाठी वापरण्यात येतो. त्यामुळे दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत आरोपीला साधा तुरुंगवास आणि एक रूपयाचा दंड ठोठावला, तसंच आरोपीने महिलेची लेखी माफी मागण्याचेही आदेश दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या