रक्तपिपासू मातेने मुलाच्या शरीरातून काढले 130 लीटर रक्त

सामना ऑनलाईन। डेन्मार्क

डेन्मार्कमध्ये पोटच्या मुलाच्या शरीरातून 130 लीटर रक्त काढणाऱ्या एका माथेफिरू मातेला (37) चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पाच वर्षापासून ती मुलाच्या शरीरातून रक्त काढत होती.

ही महिला पेशाने नर्स असून मुलगा 11 महिन्याचा होता तेव्हापासून ती त्याच्या शरीरातून इंजेक्शनद्वारे रक्त काढायची. नंतर ते रक्त ती शौचालयात फेकून द्यायची. मुलगा सात वर्षांचा होईपर्यंत ती त्याच्या शरीरातून रक्त काढत होती. अखेर 2017 साली मुलगा अचानक आजारी पडला. त्याच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याने डॉक्टरांनी त्याच्या काही चाचण्या केल्या. त्यावेळी त्याला आतड्यांचा दुर्मिळ आजार झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे डॉक्टरांनी त्याला रक्त चढवले. पण त्यानंतरही मुलाची तब्येतीत सुधारणा झाली नाही. मुलाला इतके रक्त चढवूनही शऱीरात रक्ताची कमतरता निर्माण होत असल्याने डॉक्टरही चक्रावले. डॉक्टरांना संशय आला व त्यांनी याबद्दल पोलिसांना कळवले. त्यानंतर मुलाच्या आईवर नजर ठेवण्यात आली. त्त्यावेळी रक्ताच्या बॅगेसकट तिला पोलिसांनी रंगेहात पकडले. न्यायालयात महिलेने आपणच मुलाचे रक्त काढत असल्याची कबुली दिली. पण त्याचे कारण मात्र ती सांगू शकली नाही. गेल्या पाच वर्षात तिने मुलाच्या शरीरातून 130 लीटर रक्त काढल्याचे न्यायालयाला सांगितले. दरम्यान, मानसोपचारतज्ज्ञांनी तिला ‘दुर्मिळ सिंड्रोम’ नावाचा मानसिक विकार जडल्याचे न्यायालयाला सांगितले.  त्यानंतर मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या