खड्डे एकट्या मुंबईतच नाहीत, राज्यभरात आहेत! कोर्टाने सरकारला खडसावले

62

सामना प्रतिनिधी । मुंबई

एकटय़ा मुंबईतच नाही, तर राज्यभर खड्डे असून आणखी कितीजणांचे बळी तुम्हाला हवे आहेत, असा सणसणीत सवाल उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला केला. राज्यातील जनतेला चांगले रस्ते देणे हे तुमचे कर्तव्यच आहे हे विसरू नका, असेही न्यायालयाने बजावले.

रस्त्यांवरील खड्डय़ांच्या संदर्भात न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेऊन उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्यात खड्डय़ांमुळे आतापर्यंत सुमारे २५ जणांचे बळी गेल्याचे आम्ही वर्तमानपत्रात वाचले आहे. पुढील पावसाळय़ापर्यंत आणखी किती जणांचे बळी घेणार आहात, असा संतप्त सवाल खंडपीठाने सरकारला केला. रस्ते आणि खड्डय़ांच्या प्रश्नांवर तुम्ही केलेल्या समित्यांवर आता आमची सुपर कमिटी नेमावी असे आम्हाला वाटू लागलेय, अशी चपराकही खंडपीठाने लगावली.

खड्डय़ांचा प्रश्न केवळ मुंबईपुरता नाही, तर संपूर्ण राज्यात आहे. आपण जनतेला चांगले रस्तेही देऊ शकत नाही ही शरमेची बाब आहे, असे सांगत नागरिकांनी खड्डय़ांबाबत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, अशी सूचनाही खंडपीठाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या