मावस भाऊ आणि बहिणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या

1673

आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे मावस भाऊ आणि बहिणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१३) पहाटे घडली. या घटनेने खळबळ उडाली असून आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व भागातील खडकी गावठाणानजीक स्मशानभूमीजवळच्या  एका विहिरीत नात्याने मावस बहीण व भाऊ असणाऱ्या अक्षय अशोक जाधव (वय २४) आणि ऋतुजा उत्तम तट्टु (वय १९) या दोघांनी आत्महत्या केली. आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी  सकाळी उघडकीस आली.

दोघे बहीण भाऊ शेजारी शेजारी राहत होते. मुलगा अक्षय याचे वडील मयत असून तो मूळचा राजूरी येथील आहे. आई माहेरी येवून राहत होती. खडकी गावातील ऋतुजा उत्तम तट्टु मंगळवारी पहाटे ३ वाजता घरातून बेपत्ता झाल्याची खबर तिचे वडील उत्तम तट्टु यांनी मंचर पोलिसांना आज सकाळी दिली. त्यानंतर मंचर पोलिसांनी ऋतुजा तट्टु हिचा शोध सुरू केला.

त्यानंतर खडकी येथील पोलीस पाटील मंगल पोखरकर यांनी खडकी स्मशान भूमीजवळील विहिरीत एक तरुण आणि तरुणीचा मृतदेह दिसत असल्याचे पोलिसांना कळविले. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे, पोलीस कर्मचारी राजेंद्र हिले, विनोद गायकवाड, सुनिल शिंदे, दिनेश माताडे, गणेश तेली यांनी घटनास्थळी जावून विहिरीत पाहिले असता तेथे ओढणीने एकमेकांना बांधून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास भागवत यांनी दोघांचे शवविच्छेदन केले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अक्षय जाधव आणि ऋतुजा तट्टु या दोघांनी नेमकी आत्महत्या का केली. याचा शोध मंचर पोलीस घेत आहेत.